Loni Kalbhor: लोणी काळभोर, (पुणे) : जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी चोरणाऱ्या दोन अट्टल चोरट्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण (ग्रामीण) शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले. या चोरट्यांकडून 13 दुचाकी वाहनांसह 12 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
संदीप बारकू दुधवडे (वय १८, रा. म्हसोबा झाप, ता. पारनेर), तुषार पांडुरंग केदार (वय २२, रा. पोखरी पवळदरा, ता. पारनेर, जि. अहमदनगर) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांच्याकडून तब्बल ११ लाख ५० हजार रुपयांच्या एकूण १३ दुचाकी हस्तगत करण्यात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी दिली.
पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी चोरी होत असल्याच्या घटना वारंवार घडत होत्या. त्या अनुषंगाने वरिष्ठांनी दिलेल्या आदेशानुसार या चोरीच्या दुचाकींचा शोध घेत असताना एका खबऱ्याकडून माहिती मिळाली की, संदीप दुधवडे व तुषार केदार काही कामधंदा करत नसून त्यांच्याकडे वेगवेगळ्या दुचाकी असतात.
मिळालेल्या माहितीच्या आधारे, गुन्हे शाखेच्या पथकाने संशयितांची माहिती घेतली असता आरोपी दोघेजण नारायणगाव येथील नंबरवाडी या ठिकाणी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, या ठिकाणी सापळा रचून दोघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी खेड, नारायणगाव, आळेफाटा, जुन्नर परिसरातुन तसेच नगर भागातून काही मोटरसायकल चोरल्याची कबुली दिली.
ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, पोलीस उपनिरीक्षक अभिजीत सावंत, पोलीस अंमलदार दिपक साबळे, विक्रम तापकीर, राजू मोमीण, अतुल डेरे, संदिप वारे, अक्षय नवले, निलेश सुपेकर यांनी केली आहे. आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून, पुढील तपास नारायणगाव पोलीस करत आहेत.
दोन घरफोड्या, चोरी केल्याचेही तपासात समोर
गुन्हे करताना त्यांच्यासोबत त्यांचा तिसरा साथीदार भाऊसाहेब गंगाराम दुधवडे हा असल्याचे तपासादरम्यान सांगितले. तसेच त्यांनी दोन घरफोड्या, चोरी केल्याचे सांगितले. आरोपी हे रात्रीच्या वेळी एकत्र येऊन मजूरी कामासाठी जातो, असे घरी सांगून विशेषतः स्प्लेंडर दुचाकी चोरी करत होते.
46 दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस
आरोपींकडून तपासादरम्यान ११ लाख ५० हजार रुपयांच्या एकूण १३ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. पुढील तपास नारायणगाव पोलीस करत आहेत. स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीणकडून २०२३ मध्ये चोरीला गेलेल्या एकूण ७० दुचाकी हस्तगत केल्या असून, ४६ दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत.