पुणे : पुण्यातून दहा दिवसांपूर्वी कोल्हापूर आणि हुबळीसाठी वंदे भारत एक्स्प्रेस सुरू झाली आहे. तीन दिवस हुबळीसाठी आणि तीन दिवस कोल्हापूरसाठी वंदे भारत धावत आहे. तर दर मंगळवारी वंदे भारत एक्स्प्रेस बंद असते. पहिल्या फेरीपासूनच वंदे भारत एक्स्प्रेसला प्रवाशांचा प्रतिसाद वाढत आहे. हुबळी-पुणे मार्गावरील वंदे भारत एक्स्प्रेसला प्रवाशांचा सर्वाधिक प्रतिसाद असल्याचे पहिल्या आठवड्यातील आकडेवारी समोर आले आहे.
पुणे-हुबळी वंदे भारत एक्स्प्रेस सुरू झाल्यानंतर त्या मार्गावर प्रवास करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पुणे-मिरज मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम सुरू असल्यामुळे या मार्गावर अगोदरच कमी गाड्या धावत आहेत. त्यामुळे या मार्गावर प्रवास करण्यासाठी अडचणी येत होत्या. पण, आता देशाची वेगवान एक्स्प्रेस असलेल्या वंदे भारत या मार्गावर सुरू झाल्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. येत्या काही दिवसांमध्ये वंदे भारतला आणखी प्रतिसाद वाढेल, असा विश्वास रेल्वे अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
पुणे-कोल्हापूर दरम्यान धावणाऱ्या वंदे भारतला सध्या ६० टक्के प्रवाशांचा प्रतिसाद आहे. तर, कोल्हापूर-पुणे वंदे भारतला ५७ टक्के प्रतिसाद मिळतोय. हुबळी-पुणे मार्गावर धावणाऱ्या वंदे भारतला सर्वाधिक चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. या मार्गावर पहिल्या आठवड्यात वंदे भारतला सरासरी ६९ टक्के प्रवाशांचा प्रतिसाद आहे. तर, पुणे-हुबळी मार्गावर ५८ टक्के प्रवाशांचा प्रतिसाद दिसून आला.