पुणे : पुण्यात अपघातांचे सत्र काही थांबायचं नाव घेत नाहीये. पुण्यात पुन्हा एकदा अपघात झाल्याची बातमी समोर येत आहे. शहरात एका महिला कॉन्स्टेबलला नाकाबंदी दरम्यान उडवल्याची घटना घडली आहे. ही घटना रविवारी मध्यरात्री घडली आहे. यात भरधाव वेगाने आलेल्या चार चाकी कारने नाकाबंदीसाठी तैनात असणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्याला धडक दिली आहे. याप्रकरणी वाहनचालकाला पोलीसांनी ताब्यात घेतलं आहे.
दीपमाला राजू नायर (वय 35) असे गंभीर जखमी झालेल्या महिला कर्मचाऱ्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दीपमाला नायर बंडगार्डन वाहतूक विभागात नेमणुकीस आहेत. वाहतूक विभागाकडून ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’ च्या कारवाईसाठी विशेष मोहीम राबविली जात आहे. त्यामुळे बंडगार्डन वाहतूक विभाग आरटीओ ऑफिसजवळील नायडू लेन येथे नाकाबंदी लावण्यात आली होती. तेथे महिला कॉन्स्टेबलला नायर आणि त्यांचे सहकारी, वरिष्ठ अधिकारी वाहनांची तपासणीकरून मद्यपी वाहनचालकांवर कारवाई करीत होते. त्यावेळी मध्यरात्री भरधाव वेगाने चारचाकी त्यांच्या अंगावर आली. त्यावेळी त्यांनी स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, ही धडक इतकी जोरदार होती की यात त्या गंभीर जखमी झाल्या आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, हा घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पुणे जिल्ह्यात अपघाताच्या प्रमाणात सातत्याने वाढ होत आहे. रोज अपघाताच्या घटना समोर येत आहेत. त्यात अनेकांचे नाहक जीव जात आहेत. त्यामुळे अपघात रोखण्यासाठी प्रशासनाकडून सर्व पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. अनेक उपाययोजना राबवल्या जात आहेत. मात्र, अपघाताच्या संख्येत सातत्याने वाढ होताना दिसून येत आहे.