पुणे, ता. 21 : एमबीबीएस प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवत जुळ्या मुलींच्या पालकांची तब्बल 5 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणी एड्युव्हिओ लर्निंग सोल्युशन्स कंपनीच्या काऊन्सलर व संचालकांविरुद्ध विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Pune fraud

या प्रकरणात काऊन्सलर रोनित सर तसेच कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरगटपा अरविंदराव ऊर्फ अदित्य कुमार उर्फ अदित्य देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याबाबत मुर्तिजापूर येथील 51 वर्षीय पालकांनी तक्रार दिली आहे. Pune fraud
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या जुळ्या मुलींनी बारावीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर एमबीबीएस प्रवेशासाठी त्यांनी पुण्यातील रोनित यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर त्यांना हैदराबादस्थित एड्युव्हिओ लर्निंग सोल्युशन्स प्रा. लि. या शिक्षण सल्लागार संस्थेबाबत माहिती देण्यात आली.
कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेश मिळवून देण्याचे आश्वासन देत प्रत्येकी अडीच लाख रुपये, असे एकूण 5 लाख रुपये एचडीएफसी बँकेतील कंपनीच्या खात्यात भरण्यास सांगितले. त्यानुसार 29 डिसेंबर 2025 रोजी ही रक्कम भरली गेली. मात्र, त्यानंतर प्रवेशाबाबत कोणतीही ठोस माहिती देण्यात आली नाही. 5 मार्च 2026 रोजी चौकशी केली असता, संबंधित काऊन्सलरकडून टाळाटाळ करण्यात आली. दरम्यान, कंपनीच्या सीईओकडून देशभरातील अनेक पालकांची फसवणूक झाल्याची माहिती समोर आली. Pune fraud
तसेच हैदराबाद येथील पेठ बशीराबाद पोलीस ठाण्यात अशाच प्रकारच्या फसवणुकीचे गुन्हे दाखल असल्याचे समजताच, आपलीही फसवणूक झाल्याचे फिर्यादी यांच्या लक्षात आले. पैसे परत करण्याचे आश्वासन देऊनही रक्कम परत न केल्याने त्यांनी सुरुवातीला मुर्तिजापूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. नंतर हा गुन्हा विमानतळ पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.
दरम्यान, एड्युव्हिओ कंपनीविरुद्ध यापूर्वीही देशातील विविध राज्यांमध्ये एमबीबीएस प्रवेशाच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचे आरोप असून, या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत. Pune fraud







