(Pune) पुणे : आंबे खाण्यास कोणाला आवडत नाही. एखाद दुसरे सोडले तर आंबा शोकीनांची संख्या अधिकच. खाण्यासह आंब्यावर प्रेम करणारे तसे कमी सापडतील. तीला आंबे खूप आवडायचे. ती आवडीने आंबे खात असे. या आवडीचे रुपांतर तिने व्यवसायात केले. चक्क तीने स्वत:च्याच नावाने ब्रँड तयार करून आंबे विक्री करण्याला सुरुवात केली. मात्र नियतीला ते मान्य नव्हते. तिचे वर्षभरापूर्वी तिच्यावर काळाने घात केला. पुणे मुंबई रस्त्यावर एका अपघातात अचानक निधन झाले. तिच्या पहिल्या स्मृती दिना निमित्ताने वडिलांनी पुण्यातील जनता वसाहतीमधील मुलींना हापूस आंबे खाऊन व तिच्या आठवणींना उजाळा दिला.
मास मीडिया कम्युनिकेशनची विद्यार्थीनी…!
सत्येंद्र राठी सामाजिक कार्यकर्ते, लेखक आहे. कलाकाव्यप्रेमी रसिक आहेत. प्रियम ही त्यांची मुलगी. तिला आंबे अतीशय आवडायचे. ती मास मीडिया कम्युनिकेशनची विद्यार्थीनी होती. सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सदैव अग्रेसर असे. स्नूकर खेळणे, पर्यटन, साहसी क्रीडा प्रकारात सहभाग, ट्रेकिंग, फोटोग्राफी, मेंडोलीन वाजविणे, ढोल पथक, मॉडलिंग, इत्यादी अनेक उपक्रमात प्रियमचा उत्स्फूर्त सहभाग असे. यातूनच तिचे फार मोठे मित्रवर्तूळ तयार झाले होते.
९ एप्रिल २०२२ रोजी तरूण प्रियमचे पुणे मुंबई रस्त्यावर झालेल्या एका अपघातात निधन झाले. यावर्षी तिचा पहिला स्मृती दिन सत्येंद्र यांनी अभिनव पद्धतीने साजरा केला. जनता वसाहतीमधील कुटुंबातल्या लहानमोठ्या मुलींना त्यांनी वसाहतीमधीलच जनता सांस्कृतिक सभागृहात एकत्र बोलावले. प्रियमच्या मित्रमैत्रींणीनांही त्यांनी यात सहभागी करून घेतले. या सर्व मुलींना त्यांना मनसोक्त हापूस आंबे खायला दिले.
‘आंबा पिकतो रस गळतो, कोकणचा राजा बाई झिम्मा खेळतो…’ अशी गाणी म्हणत या मुलींनी आंबे खायचा आनंद लुटला. कोकणच्या राजाची चव चाखली तेव्हा त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. रसरशीत आंब्यांचा आस्वाद घेताना जीभेला सुटलेले पाणी, रसामुळे माखलेले हात, रंगलेले चेहरे आणि हास्यकल्लोळात दंग झालेल्या मुली हे पाहून प्रियमच्या आठवणी सुसह्य झाल्या असे सत्येंद्र यांनी सांगितले. या मुलींच्या रूपात प्रियमनेच आंबे खाल्ल्याचे समाधान मला मिळाल्याचे त्यांनी सागितले.