दौंड: आज जिल्हाधिकारी कार्यालयात पंचायत समिती सभापती आरक्षण सोडत जाहीर झाली असून आता सर्वांचे लक्ष जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य (Zilla Parishad and Panchayat Samiti Reservation) आरक्षणाच्या सोडतीकडे लागले आहे.
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी (District Collector Jitendra Dudi) यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेतील 73 सदस्य पदाकरिता आरक्षण सोडत 13 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजता, बहुउद्देशीय सभागृह, 5 वा मजला, जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित करण्यात आली आहे. तर याच दिवशी पंचायत समिती सदस्य पदांकरिता आरक्षण सोडतीचे संबंधित तालुक्यात आयोजन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, 1961 व महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या (जागांच्या आरक्षणाची पद्धत व चक्रानुक्रम) नियम 2025 नुसार जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रात सभा घेऊन अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व त्यामधील स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा आणि सर्वसाधारण स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा निश्चित करावयाच्या आहेत. याकरिता सोडत कार्यक्रमाचे 13 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजता तालुकानिहाय आयोजन करण्यात आले आहे.
कोणत्या पंचायत समितीची आरक्षण सोडत कुठे?
- जुन्नर, आंबेगाव, खेड, मुळशी, वेल्हे आणि पुरंदर पंचायत समिती- पंचायत समिती कार्यालयाच्या सभागृहात
- शिरूर पंचायत समिती- नवीन प्रशासकीय इमारत, तहसील कार्यालय, शिरूर
- मावळ पंचायत समिती- भेगडे लॉन्स, वडगांव मावळ, ता. मावळ
- हवेली पंचायत समिती सोडत- उद्यान प्रसाद कार्यालय, 1712/1 बी, सी व्ही जोशी मार्ग, खजिना विहीर चौक, माडीवाले कॉलनी, सदाशिव पेठ
- दौंड पंचायत समिती- बैठक सभागृह, दुसरा मजला, नविन प्रशासकीय इमारत, तहसील कार्यालय-दौंड
- भोर पंचायत समिती- अभिजीत मंगल कार्यालय महाड रस्ता भोर
- बारामती पंचायत समिती- कवी मोरोपंत सभागृह, इंदापूर रस्ता, बारामती
- इंदापूर पंचायत समिती- राधिका रेसिडेन्सी क्लब, इंदापूर
आरक्षण सोडतीसाठी येथे बैठका आयोजित करण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक 2025 तथा उपजिल्हाधिकारी (रोहयो) डॉ. चारुशीला देशमुख-मोहिते यांनी दिली आहे.







