उरुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचन – जेजुरी मार्गावरील शिंदवणे घाटात टेम्पो पलटी होऊन झालेल्या अपघातात एका १८ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर तीनजण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात सोमवारी (ता. 08) मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास झाला आहे. जखमींवर उरुळी कांचन येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पुजन झुब्बर पासवान वय (१८, रा. शिंदवणे, वळती फाटा ता. हवेली) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर उमेष झुब्बर पासवान (वय -२१), दिलीप कुमार (वय – ४५), झुब्बर रामाश्रय पासवान (वय- ४१, रा. शिंदवणे वळती फाटा ता. हवेली) अशी अपघातात जखमी झालेल्या तिघांची नावे आहेत.
याप्रकरणी मयत पुजन पासवान याचे वडील झुब्बर रामाश्रय पासवान यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चालक गौतम नामदेव मेमाणे (रा. वळतीफाटा शिंदवणे, ता. हवेली, मुळ रा. पारगाव मेमाणे ता. पुरंदर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उरुळी कांचन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, झुब्बर पासवान व त्यांची दोन मुले, एक कामगार व टेम्पो चालक हे भंगार मालाचे साहित्य घेऊन सासवड भागातून उरुळी कांचनकडे रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास निघाले होते. साडेबारा वाजण्याच्या सुमारास शिंदवणे घाटात आले असता चालक गौतम मेमाणे यांना वळणावरील रस्त्याचा अंदाज आला नाही. त्यांचा टेम्पोवरील ताबा सुटला व टेम्पो घाटात पलटी झाला.
या अपघातात पुजन पासवान याच्या डोक्याला, हाताला मोठ्या प्रमाणात जखमा झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर उमेष पासवान, झुब्बर पासवान, दिलीप कुमार व चालक गौतम मेमाणे जखमी झाले आहेत. उमेष पासवान याची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर उरुळी कांचन येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
दरम्यान, याप्रकरणी मयत पुजन पासवान याच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चालक गौतम मेमाणे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक जगताप करीत आहेत.