लोणी काळभोर, ता. 12 : थेऊर (ता. हवेली) येथे भाऊबीजचा कार्यक्रम आटोपून आई आणि सात वर्षांच्या मुलीला दुचाकीवरून घेऊन घरी परतणाऱ्या तरुणाची दुचाकी लोणी स्टेशन चौकात घसरून भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीचालक तरुण रस्त्यावरील दुभाजकाला धडकून गंभीर जखमी झाला, तर त्याची आई आणि मुलगी किरकोळ जखमी झाल्या. ही घटना पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील लोणी स्टेशन चौकात गुरुवारी (ता. 12) सकाळी साडेआठच्या सुमारास घडली.

करण सनी सावंत (वय 28) असे गंभीर जखमी तरुणाचे नाव आहे. तर त्याची आई उषा सनी सावंत (वय 47) आणि मुलगी देवांशी करण सावंत (वय 7, सर्व रा. गोसावीवस्ती, साडेसतरानळी, हडपसर) या किरकोळ जखमी झाल्या आहेत. तिघांवरही विश्वराज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, करण सावंत हा आई उषा आणि मुलगी देवांशी यांना घेऊन थेऊर येथील मामाच्या घरी भाऊबीजच्या कार्यक्रमासाठी गेला होता. कार्यक्रम आटोपल्यानंतर तिघेही दुचाकीवरून घरी परतत होते. पुणे-सोलापूर महामार्गावरून जात असताना लोणी स्टेशन चौकात अचानक दुचाकी घसरली. यावेळी करण याचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने तो थेट रस्त्याच्या दुभाजकाला जाऊन धडकला.

या अपघातात करण याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, तो अद्याप बेशुद्धावस्थेत असल्याची माहिती मिळाली आहे. आई आणि मुलगी किरकोळ जखमी झाल्या आहेत. लोणी स्टेशन चौकातील वाहतूक आणि अपघातांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, या चौकात सुरक्षित वाहतुकीसाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.








