फुरसुंगी, ता. 11 : पार्क केलेल्या टेम्पो ट्रॅव्हलरचे काम करण्यासाठी गेलेल्या तरुणाला ‘तू इकडे कशाला आलास, येथे फिरकायचे नाही’ असे म्हणत शिवीगाळ करून लाकडी बांबूने मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही घटना फुरसुंगी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत गुरुवारी (ता.10) सायंकाळी सव्वासातच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी तीन जणांविरोधात फुरसुंगी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

प्रमोद माऊली राखपसरे, प्रमेश ऊर्फ भावड्या राजू राखपसरे आणि विशाल ऊर्फ भावड्या बंडू भोसले अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तिघांची नावे आहे. याप्रकरणी सूरज रमेश देवकर (वय 35 , व्यवसाय ट्रान्सपोर्ट, रा. इंदिरा वसाहत, फुरसुंगी) यांनी फुरसुंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांकडे दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सूरज देवकर यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय असून त्यांच्याकडे तीन टेम्पो ट्रॅव्हलर आहेत. या गाड्या ते घराजवळील कुस्ती आखाड्याशेजारी पार्क करतात. देवकर हे त्यांच्या पार्क केलेल्या टेम्पो ट्रॅव्हलरचे काम करण्यासाठी कुस्ती आखाड्याशेजारी, पाण्याच्या टाकीजवळ गेले होते. त्यावेळी तेथे प्रमोद राखपसरे, प्रमेश राखपसरे आणि विशाल भोसले हे तिघे बसले होते.

प्रमोद राखपसरे याने देवकर यांना शिवीगाळ करत ‘तू इकडे कशाला आलास, तू येथे फिरकायचे नाही’ असे म्हणत लाकडी बांबूने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर प्रमेश राखपसरे आणि विशाल भोसले यांनीही लाकडी बांबूने मारहाण केल्याचा आरोप आहे.
आरडाओरड ऐकून सूरज देवकर यांचा भाऊ सुनिल देवकर हा भांडण सोडविण्यासाठी तेथे आला. त्यावेळी तिन्ही आरोपींनी सुनिल यालाही हाताने मारहाण करून शिवीगाळ केली. तसेच ‘तुम्हाला बघून घेतो’ अशी धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.
या घटनेनंतर सूरज देवकर यांनी डायल 112 वर फोन केला. त्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी त्यांना फुरसुंगी पोलिस चौकी, भेकराईनगर येथे आणले. उपचारासाठी त्यांना ससून रुग्णालयाची वैद्यकीय यादी देण्यात आली. उपचार घेतल्यानंतर त्यांनी फुरसुंगी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.या प्रकरणी सूरज देवकर यांनी प्रमोद माऊली राखपसरे, प्रमेश ऊर्फ भावड्या राजू राखपसरे आणि विशाल ऊर्फ भावड्या बंडू भोसले यांच्याविरोधात कायदेशीर तक्रार दिली असून, पोलिसांकडून पुढील कारवाई करण्यात येत आहे.







