धाराशिव : जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील खासापुरी गावातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे.गेल्या 10 दिवसांत तब्बल 3 शेतकऱ्यांनी आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवली आहे.याच गावातील 29 वर्षीय तरुण प्रथमेश देशमुख याने काही दिवसांपूर्वी पुण्यात आत्महत्या केली होती. तो गेल्या काही वर्षांपासून एमपीएससी व इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करत होता. शेतातील नुकसान, कौटुंबिक कर्ज आणि वारंवार पुढे ढकलल्या जाणाऱ्या परीक्षांमुळे तो प्रचंड तणावात होता.

मिळालेल्या माहितीनुसार,परंडा तालुक्यातील खासापुरी गावात तब्बल 3 शेतकऱ्यांनी आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवली आहे. गेल्या वर्षी ओला दुष्काळ आणि यंदा कोरड्या दुष्काळामुळे शेतातील खरीप पिके पाण्याअभावी पूर्णपणे करपून गेली आहेत. यामुळे पाण्याचा आणि जनावरांच्या चाऱ्याचा भीषण प्रश्न निर्माण झाला असून, निसर्गाच्या या अवकृपेमुळे मराठवाड्यातील शेतकरी पूर्णपणे कोलमडून गेला आहे.

या संकटसमयी संपूर्ण गावात शोकाकुल वातावरण पसरले आहे. पीडित कुटुंबांना धीर देण्यासाठी स्थानिक आमदार तानाजी सावंत यांनी तातडीने मदत केली असून, त्यांनी तीनही मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची आर्थिक मदत सुपूर्द केली आहे.

दुसरीकडे, पुणे पोलिसांना प्रथमेशने लिहिलेली एक चिठ्ठी सापडली, ज्या आधारे तो ऑनलाइन गेमिंग आणि बेटिंगच्या जाळ्यात अडकल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. मात्र, प्रथमेशच्या कुटुंबीयांनी पोलिसांचे हे आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. प्रथमेश अतिशय मेहनती आणि सुजाण मुलगा होता, तो अशा कोणत्याही चुकीच्या मार्गाला जाऊच शकत नाही, असा ठाम विश्वास व्यक्त करत कुटुंबीयांनी पोलिसांच्या निष्कर्षावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
सततचा दुष्काळ आणि प्रथमेशच्या आत्महत्येचे गूढ यामुळे सध्या खासापुरी गावात अत्यंत चिंतेचे व दुःखाचे सावट पसरले आहे






