यवत : तालुक्यातील नांदूर गावच्या हद्दीत असलेल्या ‘गिट्स’ कंपनीतून तांब्याची केबल लांबवणाऱ्या एका सराईत चोरट्याला यवत पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईत पोलिसांनी 60 हजार रुपयांची तांब्याची केबल आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण 1 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,सागर विभिषण जाधव (वय 25, सध्या रा. तुपेवस्ती, ता. हवेली, मूळ रा. सहजपूर, ता. दौंड, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.दिनांक 2 सप्टेंबर रोजी मध्यरात्री 1 वाजेच्या सुमारास गिट्स कंपनीच्या आवारातून सुमारे 94 हजार रुपये किमतीच्या वेगवेगळ्या आकाराच्या तांब्याच्या केबल्स चोरीला गेल्या होत्या. याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात अज्ञातांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला होता.

गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली. घटनास्थळावरील व परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची सखोल पाहणी केली असता, सागर जाधव यानेच ही चोरी केल्याची पक्की माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. पोलिसी हिसका दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

ही यशस्वी कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदिपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी बापुराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर आणि तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक मारोती मेतलवाड यांच्यासह पोलीस हवालदार संदीप देवकर, रॉकी देवकाते, धीरज जाधव, प्रतीक जगताप, अमोल भुजबळ, सचिन गुंड, दिनेश लोणकर व विनीत कुन्हाडे यांनी या तपासात महत्त्वाची भूमिका बजावली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक तासगावकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार रवींद्र मोहिते करत आहेत







