हडपसर, ता. 2 : जुन्या भांडणाचा राग मनात धरून वाद मिटवण्याच्या बहाण्याने तरुणाला बोलावून घेत त्याच्यावर चौघांनी लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना हडपसरमधील गोंधळे नगर परिसरात घडली. यावेळी एका आरोपीने कोयत्याने तरुणाच्या पाठीवर तीन वार केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याच्या पाठीवर टाके घालण्यात आले आहेत.

चैतन्य संतोष महाडीक (वय 26, रा. जिजामाता वसाहत, हडपसर) यांनी याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार आदित्य दळवी (वय 24), ओमकार ताकवले (वय 23), ओमकार सावंत आणि उंबऱ्या उर्फ ओमकार भोईटे यांच्याविरुद्ध तक्रार करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चैतन्य यांच्या बहिणीसोबत मैत्रिणी तनु दळवी ही 22 ऑगस्ट रोजी फुरसुंगी येथील मंतरवाडी चौकात ब्युटी पार्लरमध्ये गेली होती. त्यानंतर चैतन्य यांनी तनुचा भाऊ आदित्य दळवी याला याबाबत फोन केला होता. यावरून दुसऱ्या दिवशी चैतन्य आणि आदित्य यांच्यात वाद झाला होता.

दरम्यान, 1 सप्टेंबर रोजी सायंकाळी ओमकार ताकवले याने चैतन्य यांना फोन करून जुन्या भांडणाचा वाद मिटवण्यासाठी गोंधळे नगर येथे बोलावले. त्यानुसार रात्री साडेआठच्या सुमारास चैतन्य हे त्यांचा भाऊ विकी महाडीक याच्यासोबत तेथे गेले. यावेळी तेथे आदित्य दळवी, ओमकार ताकवले, ओमकार सावंत आणि ओमकार भोईटे उपस्थित होते. जुन्या भांडणाच्या रागातून चौघांनी शिवीगाळ करून दोन्ही भावांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. यावेळी ओमकार भोईटे याने छोट्या हत्याराने विकी यांच्या डाव्या हातावर वार केल्याने ते घाबरून तेथून पळून गेल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

त्यानंतर आदित्य दळवी आणि ओमकार सावंत यांनी चैतन्य यांचे दोन्ही हात पकडले. ओमकार सावंत याने डोक्यात आणि उजव्या डोळ्याजवळ कशाच्या तरी सहाय्याने मारहाण केल्याचा आरोप आहे. त्याचवेळी ओमकार ताकवले याने कमरेला लावलेला कोयता बाहेर काढला. कोयता पाहून चैतन्य यांनी तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपीने पाठलाग करून त्यांच्या पाठीवर तीन ठिकाणी कोयत्याने वार केल्याचा आरोप आहे. यात चैतन्य यांच्या पाठीला गंभीर जखम होऊन रक्तस्राव झाला.
जखमी अवस्थेत चैतन्य आणि त्यांचे भाऊ हडपसर पोलीस ठाण्यात पोहोचले. पोलिसांनी दोघांना उपचारासाठी ससून रुग्णालयात पाठविले. उपचारादरम्यान चैतन्य यांच्या पाठीवरील जखमेवर टाके घालण्यात आले. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस हवालदार टिळेकर करीत आहेत.







