उरुळी कांचन : दिव्यांगांप्रती समाजामध्ये स्नेहभाव वाढीस लागावा, तसेच समाजातील एक उपयुक्त घटक म्हणून पुढे येण्यास त्यांना प्रेरणा मिळावी, यासाठी जागरुकता निर्माण करण्यासाठी उरुळी कांचन ग्रामपंचायतीच्या वतीने जागतिक दिव्यांग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी उपस्थित असलेल्या दिव्यांग बांधवांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. तसेच बिस्किटाच्या पुड्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी उरुळी कांचनचे सरपंच अमित बाबा कांचन, माजी सरपंच संतोष कांचन, सदस्य मयूर कांचन, पंचायत समितीकडून आलेले गणेश टिळेकर सर, आदि ग्रामस्थ व दिव्यांग बांधव व महिला उपस्थित होते.
यावेळी पंचायत समितीकडून गणेश टिळेकर यांनी दिव्यांग बांधवाना मार्गदर्शन केले. अपंगांचे अधिकार आणि कल्याणला चालना देण्यासाठी आणि राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक जीवनाच्या मूल्यांबाबत जागरूकता वाढवण्याच्या उद्देशाने हा दिन साजरा करण्यात येतो. शासनाकडून कश्याप्रकारे निधी देण्यात येतो याची माहिती यावेळी टिळेकर यांनी दिली.
दरम्यान, देशात अपंग असलेल्या लोकांसाठी सरकारने अनेक धोरणे आखली आहे. त्यांना सरकारी नोकऱ्या, हॉस्पिटल, रेल्वे, बस सर्वत्र आरक्षण मिळते. सरकारने दिव्यांगांसाठी पेन्शन योजनाही सुरू केली असल्याची माहितीही टिळेकर यांनी दिली.