मृत महिलेचे नाव रेश्मा महेबूब इनामदार (वय 44, रा. सोमवार पेठ, पुणे) असे आहे. त्या गेल्या 8 ते 10 वर्षांपासून न्यूक्लिअस मॉलमध्ये हाऊसकीपिंग कर्मचारी म्हणून काम करत होत्या. नेहमीप्रमाणे त्या गुरुवारीही आपल्या कामावर हजर होत्या.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रेश्मा इनामदार या मॉलच्या 9व्या मजल्यावर साफसफाई करत होत्या. याच दरम्यान त्यांचा तोल गेल्याने त्या डक्टच्या मोकळ्या जागेतून थेट खाली पडल्या. उंचावरून पडल्यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच बंडगार्डन पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह पुढील तपासासाठी आणि शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून नेमका अपघात कसा झाला, याचा तपास सुरू आहे.
दरम्यान, मॉलमधील सुरक्षिततेच्या उपाययोजनांबाबतही चौकशी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. साफसफाईचे काम करताना आवश्यक सुरक्षा साधने उपलब्ध होती का, तसेच डक्ट परिसरात संरक्षणाची योग्य व्यवस्था होती का, याची माहिती पोलिसांकडून घेतली जात आहे.
या घटनेमुळे मॉलमधील कर्मचारी आणि परिसरातील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. अनेक वर्षे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने सहकाऱ्यांनाही मोठा धक्का बसला आहे. तपासानंतर या अपघातामागील नेमके कारण स्पष्ट होणार असून, पोलिसांकडून सर्व बाजूंनी चौकशी सुरू आहे.







