बारामती, (पुणे) : मोरगाव येथील वीज ग्राहकाने कोयत्याने वार केलेल्या महावितरणच्या तंत्रज्ञ महिला कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने जिल्ह्यासह महावितरणमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.
रिंकू राम थिटे (तंत्रज्ञ महिला कर्मचारी, महावितरण) असे उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झालेल्या महिला कर्मचाऱ्याचे नाव आहे. तर अभिजीत पोते असे मारहाण करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. आज बुधवारी (ता. 24) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वीज बिल जास्त येते, मीटर रीडिंग तपासावे अशी सातत्याने मागणी करूनही दखल घेतली जात नसल्याने अभिजित पोते या ग्राहकाने महावितरणच्या रिंकू राम थिटे यांच्यावर कोयत्याने वार केले होते. माझ्या घराचे वीज बिल मीटरचे रीडिंग घेऊन हे बिल का जास्त येते हे पहा असे तो सातत्याने सांगत होता, मात्र त्याची दखल घेतली जात नाही.
यावेळी चिडून जाऊन महावितरणच्या कर्मचाऱ्यांना जाब विचारला. यामध्ये रिंकू थिटे ही तांत्रिक कर्मचारी महिला त्याच्याशी बोलत असताना त्याने रागाने तिच्यावर कोयत्याने वार केले. अचानक झालेल्या या घटनेने रिंकू थिटे ही महिला कर्मचारी देखील घाबरली, मात्र तोपर्यंत अभिजीत पोते याने तिच्यावर वार केले होते. ती यात गंभीर जखमी झाली.
दरम्यान, त्यांना तातडीने उपचारासाठी पुणे येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या महिला कर्मचाऱ्यास या घटनेने महावितरण मध्ये मात्र प्रचंड खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपी अभिजीत पोते याला पोलिसांनी ताब्यात घेतला असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.