लोणी काळभोर, ता. 18 – एमआयटी शिक्षण संस्थेने तेथे शिक्षण घेणा-या लहान – मोठ्या मुलांचा वापर कच-या संदर्भात आंदोलन करण्यासाठी करुन राजकारण केलेले आहे. त्यावेळी गावक-यांनी विरोध वाढवला असता तर आमच्या बरोबरच त्या तरुण मुलांच्यावरही वेगवेगळे गुन्हे दाखल झाले असते. त्या मुलांच्या भविष्याचा विचार करून आम्ही सबुरीचे धोरण स्वीकारले. या धोरणाला जर एमआयटी शिक्षण संस्था जर कमजोरी समजत असेल तर तो त्यांचा गैरसमज आहे. त्यांना आम्ही कायदेशीर भाषेत उत्तर देऊ असा खणखणीत इशारा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रशांत काळभोर यांनी दिला.

हवेली तालुक्यातील लोणी काळभोर व कदमवाकवस्ती या दोन्ही ग्रामपंचायतींच्या हद्दीत गोळा होणारा कचरा गेली 25 – 30 वर्षे मुळा मुठा नदी किनारी असलेल्या शासकीय जागेत टाकला जातो.
दि. 26 फेब्रुवारी 2026 रोजी या कचऱ्याला भीषण आग लागली होती. त्या नंतर एमआयटी मधील विद्यार्थ्यांनी तेथे कचरा टाकू नये म्हणून आंदोलन केले व नदीकडे जाणारा रस्ता बंद केला होता. त्यानंतर पोलीस उपायुक्त डाॅ राजकुमार शिंदे, हवेलीचे उपविभागीय अधिकारी यशवंत माने, लोणी काळभोरच्या अप्पर तहसीलदार तृप्ती कोलते, दोन्ही ग्रामपंचायतींचे सरपंच, ग्रामसेवक यांनी कचऱ्याच्या जागेला प्रत्यक्ष भेट दिली. मात्र या प्रश्नावर अद्यापही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे दोन्ही ग्रामपंचायतींच्या हद्दीतील कचऱ्याचा हा प्रश्न जटिल बनला आहे.
या संदर्भात चर्चा करुन निर्णय घेण्यासाठी लोणी काळभोर ग्रामपंचायतीची ग्रामसभा ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रशांत काळभोर बोलत होते. गणपुर्ती अभावी हि सभा तहकूब करण्यात आली. यावेळी प्रशासक सरपंच नागेश काळभोर, माजी सरपंच राजाराम काळभोर, राहुल काळभोर, ग्रामविकास आधिकारी एस एन गवारी, माजी उपसरपंच राजेंद्र काळभोर, साधना बॅन्केचे संचालक प्रताप बोरकर, माजी ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब काळभोर, कृष्णा पवार, पांडुरंग केसकर, विविध कार्यकारी संस्थेचे माजी अध्यक्ष विठ्ठल काळभोर, अंबरनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष हेमंत गायकवाड, शिवसेना नेते रमेश भोसले, युवराज काळभोर, विनायक कांबळे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रशांत काळभोर पुढे म्हणाले एमआयटी मधील गट क्रमांक 39 मधील रस्ता गायब करण्यात आला आहे. ओढ्यावर अतिक्रमण करून ओढा गायब करण्यात आला आहे. एमआयटी शिक्षण संस्थेला स्वतःचा कचरा प्रक्रिया प्रकल्प नाही. आजही एमआयटी मधील कचरा नदीपात्रात टाकला जातो. सरकारी जागेत ग्रामपंचायतीच्या वतीने टाकण्यात येणारा कचरा कुणा एका व्यक्तीच्या घरातील कचरा नसून तो ग्रामपंचायतीचा कचरा आहे, हे एमआयटीने लक्षात घ्यावे.
या कचरा प्रश्ना बद्दल लोणी काळभोर गावातील नागरिकही अद्याप जागरूक झालेले नाहीत. कचरा हा आपला प्रश्न नसून ग्रामपंचायतीचा प्रश्न आहे असे काही नागरिकांना वाटते, हि विचारसरणी पूर्णपणे चुकीची आहे. आजच्या ग्रामसभेला सरपंचांसह फक्त तीनच ग्रामपंचायत सदस्य उपस्थित आहेत. तसेच स्थानिक नागरिकांचीही उपस्थिती कमी आहे. त्यामुळे हि ग्रामसभा तहकूब करुन नंतर बोलावण्यात यावी असा ठराव प्रशांत काळभोर यांनी मांडला.
यावेळी बोलताना राष्ट्रवादी ग्राहक संरक्षण कक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुर्यकांत गवळी म्हणाले अगोदर लोणी काळभोर गाव येथे आहे, एमआयटी नंतर आली आहे. एमआयटीचा गावाकडे बघण्याचा दृष्टीकोन पूर्वग्रहदूषित आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्याच्या वेळी मी स्वतः त्याचा अनुभव घेतला आहे. एमआयटी मध्ये गावच्या मालकीच्या असलेल्या रस्त्यावरुन स्थानिक नागरिकांना जाणे येणे बंद केले आहे. मलाही या रस्त्यावरुन एकदा जाऊ दिले नाही. आगामी काळात जर एखाद्या दलित बांधवाला गावच्या मालकीच्या रस्त्यावरुन जायला प्रतिबंध केला तर एमआयटी विरोधात ॲट्रॉसिटीचा ( दलित अत्याचार प्रतिबंधक कायदा) गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा सुर्यकांत गवळी यांनी दिला. एमआयटी संस्थेची भूमिका आडमुठी व अडेलतट्टू पणाची आहे असे मत शिवसेना नेते रमेश भोसले यांनी व्यक्त केले. या नंतर ग्रामसभा तहकूब करुन नंतर घेण्याचे ठरविण्यात आले.







