पुणे: चाकण औद्योगिक वसाहतीतील खराब रस्ते, मोठमोठे खड्डे, वाहतूक कोंडी तसेच वीज आणि पाण्याच्या समस्यांमुळे उद्योजक त्रस्त झाले आहेत. या अडचणींमुळे सुमारे 20 लघुउद्योगांनी सातारा जिल्ह्यातील खंडाळा औद्योगिक वसाहतीत स्थलांतर करण्याचा इशारा दिल्यानंतर प्रशासनाची धावपळ सुरू झाली आहे.

या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी उद्योग प्रतिनिधी तसेच स्थानिक प्रशासनाशी चर्चा केली. चाकणमधील उद्योगांच्या समस्या सोडवण्यासाठी शासनाकडून आवश्यक उपाययोजना केल्या जातील, अशी ग्वाही देण्यात आली आहे.

दरम्यान, चाकणच्या भविष्यातील विकासासाठी मोठा निर्णय होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. चाकण महानगरपालिका स्थापन करायची की स्वतंत्र इंडस्ट्रियल टाऊनशिप उभारायची, याबाबत हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रस्तावाबाबत सकारात्मक असल्याचे सांगितले जात आहे.

प्रस्तावित रचनेमध्ये चाकणसह राजगुरूनगर, आळंदी आणि आसपासच्या सुमारे 50 गावांचा समावेश होण्याची शक्यता आहे. मात्र, यापूर्वीही अशा प्रकारच्या घोषणा झाल्याने स्थानिक नागरिक यावेळी सावधपणे परिस्थितीकडे पाहत आहेत.
चाकणमध्ये सक्षम स्थानिक प्रशासन किंवा इंडस्ट्रियल टाऊनशिप अस्तित्वात आल्यास रस्ते, पाणी, वीज आणि वाहतूक यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा निघू शकतो, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे उद्योगांचे स्थलांतर रोखण्यासोबतच नवीन रोजगाराच्या संधीही निर्माण होण्याची शक्यता आहे.
काही उद्योगांनी स्थलांतराची प्रक्रिया सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शासनाने लवकर निर्णय घेण्याची मागणी उद्योजकांकडून होत आहे. चाकण हे राज्यातील महत्त्वाचे औद्योगिक केंद्र असल्याने येथील पायाभूत सुविधा मजबूत करण्याला प्राधान्य दिले जाईल, असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले आहे.







