मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झाली. मात्र, या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रत्यक्ष उपस्थित नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाली आहे. दुपारी १२ वाजता बैठक सुरू झाली असून, शिंदे बैठकीला ऑनलाइन पद्धतीने सहभागी होणार का, याकडेही लक्ष लागले आहे.

एकनाथ शिंदे यांच्या अनुपस्थितीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. शिंदे काल भीमाशंकर दौऱ्यावर होते. त्यामुळे मुंबईत परतण्यास उशीर झाल्याने ते बैठकीला उपस्थित राहू शकले नसल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, दुसरीकडे सत्ताधारी महायुतीतील काही मुद्द्यांवरून सुरू असलेल्या मतभेदांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या गैरहजेरीकडे राजकीय दृष्टिकोनातूनही पाहिले जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठी भाषेच्या मुद्द्यावरून सत्ताधारी पक्षांमध्ये वेगवेगळ्या भूमिका समोर येत आहेत. रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी देण्यात आलेल्या मुदतवाढीच्या निर्णयावरूनही शिवसेनेच्या काही नेत्यांमध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत या विषयांवर चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती.

दरम्यान, एकनाथ शिंदे आज संध्याकाळी दिल्ली दौऱ्यावर जाण्याची शक्यता असल्याची माहिती समोर येत आहे. त्यांच्या दिल्ली दौऱ्यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नसल्याने त्याबाबतही राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
दुसरीकडे, भारताचा पहिल्या तिमाहीतील जीडीपी वाढीचा दर ७.८ टक्के नोंदवला गेल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले आहे. जागतिक आर्थिक अनिश्चितता आणि युद्धाचे वातावरण असतानाही भारताची अर्थव्यवस्था मजबूत राहिल्याचे त्यांनी म्हटले आहे.
याचदरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील १४ आमदार नवरात्रीपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा दावा शिंदे गटातील एका नेत्याने केला आहे. मात्र, या दाव्याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. त्यामुळे पुढील काळात महाराष्ट्राच्या राजकारणात नेमक्या कोणत्या घडामोडी घडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






