मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणामुळे राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये मोठा संताप आहे. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत सहा जणांना अटक केली असून एका वरिष्ठ अधिकाऱ्याचाही आरोपींमध्ये समावेश आहे. दरम्यान, या प्रकरणाला प्रेमसंबंधांचा अँगल असल्याची चर्चा सुरू असतानाच तक्रारदार ऋषिकेश गांगुर्डे यांनी वेगळाच दावा केल्याने प्रकरणाला नवा ट्विस्ट मिळाला आहे.

पेपरफुटीला प्रेमप्रकरणाचा रंग देऊन मूळ प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप गांगुर्डे यांनी केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, हा केवळ काही व्यक्तींपुरता मर्यादित प्रकार नसून मोठ्या प्रमाणावर पेपरफुटी झाल्याचा संशय आहे. या प्रकरणाचा सखोल तपास करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

गांगुर्डे यांनी पेपरफुटीतील मुख्य सूत्रधाराबाबतही गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, गौरव पाटील हा स्वतः तक्रार करण्यासाठी त्यांच्यासोबत होता. त्यामुळे त्याला आरोपी कसे केले जाऊ शकते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यांनी यापूर्वी तुकाराम मुंढे यांची भेट घेऊन तक्रार केल्याचेही सांगितले.

पेपरफुटीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोपही गांगुर्डे यांनी केला. एका व्यक्तीने मोठी रक्कम देऊन पेपर मिळवल्यानंतर तो पुढे इतरांना विकला आणि त्यातून पेपर अनेक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्याचा त्यांचा दावा आहे. या प्रकाराची व्याप्ती सातारा, बीड आणि सोलापूरपर्यंत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. मात्र, हे सर्व आरोप असून त्याची स्वतंत्र तपासातून पडताळणी होणे आवश्यक आहे.
पेपरफुटीमुळे परीक्षेतील अनेक प्रश्न आधीच काही उमेदवारांना मिळाले असण्याची शक्यता असल्याने विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांचे कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR) तपासण्याची मागणी गांगुर्डे यांनी केली आहे.
दरम्यान, या प्रकरणात ऋतुजा पाटील आणि गौरव पाटील यांच्या कथित प्रेमसंबंधांमुळे पेपरफुटी उघड झाल्याची चर्चा आहे. मात्र, गांगुर्डे यांनी हा दावा फेटाळत तपासाची दिशा व्यापक ठेवण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आता पोलीस तपासातून पेपरफुटी नेमकी किती मोठ्या प्रमाणावर झाली आणि त्यामागे कोण आहे, हे स्पष्ट होणार आहे.






