पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी देशवासीयांना आवश्यकता असल्याशिवाय सोन्याची खरेदी टाळण्याचे आवाहन केले. या आवाहनानंतर सोन्या-चांदीच्या बाजारातील हालचालींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, मंगळवारी १ सप्टेंबर रोजी एमसीएक्सवर सोन्याच्या दरात घसरण झाल्याचे दिसून आले. (Gold-Silver Rate)

एमसीएक्सवर सोन्याचा भाव ३१० रुपयांनी घसरून प्रति १० ग्रॅम १ लाख ५४ हजार १५० रुपयांवर आला. दुसरीकडे चांदीच्या दरात किंचित वाढ झाली असून, प्रति किलो चांदीचा भाव २ लाख ३४ हजार ५९ रुपये नोंदवण्यात आला.

सराफा बाजारातील चित्र मात्र काहीसे वेगळे आहे. आज २४ कॅरेट सोन्याच्या दरात १६ रुपयांची वाढ झाली असून, त्याचा भाव प्रति ग्रॅम १५ हजार ६९३ रुपये, म्हणजेच प्रति १० ग्रॅम १ लाख ५६ हजार ९३० रुपये झाला आहे. २२ कॅरेट सोन्याचा भावही १५ रुपयांनी वाढून प्रति ग्रॅम १४ हजार ३८५ रुपये, म्हणजेच प्रति १० ग्रॅम १ लाख ४३ हजार ८५० रुपये झाला. तर १८ कॅरेट सोन्याच्या दरात १२ रुपयांची वाढ होऊन तो प्रति ग्रॅम ११ हजार ७७० रुपयांवर पोहोचला.

चांदीच्या सराफा बाजारातील दरात मात्र मोठी घसरण झाली आहे. चांदीच्या किमतीत तब्बल ५ हजार रुपयांची घट झाली असून, एक किलो चांदीचा भाव २ लाख ५० हजार रुपये झाला आहे.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींचाही सोन्याच्या किमतीवर दबाव असल्याचे बाजार तज्ज्ञांचे मत आहे. फेडरल रिझर्व्हची भूमिका आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीतील वाढता तणाव यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीवर परिणाम होत आहे. तेलाच्या दरात वाढ झाल्यास महागाई वाढण्याची शक्यता निर्माण होते आणि त्याचा परिणाम सोन्याच्या बाजारावरही होऊ शकतो.
आता गुंतवणूकदारांचे लक्ष अमेरिकेतील रोजगाराशी संबंधित महत्त्वाच्या आकडेवारीकडे लागले आहे. ADP रोजगार अहवालासह इतर रोजगारविषयक आकडेवारीतून अमेरिकन अर्थव्यवस्थेची स्थिती स्पष्ट होण्याची शक्यता आहे. या आकडेवारीच्या आधारे अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या आगामी व्याजदराच्या निर्णयाबाबत बाजाराला अंदाज बांधता येईल. त्यामुळे पुढील काही दिवसांत सोन्या-चांदीच्या दरात आणखी चढ-उतार होण्याची शक्यता आहे.







