लोणी काळभोर, ता. २० : लोणी काळभोर (ता. हवेली) येथील अनधिकृत बांधकामांविरोधात पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) सुरू केलेली कारवाई दुसऱ्या दिवशीही सुरूच राहिली. उद्योजक हेमंत सोपान हाडके यांच्या सुमारे ४२ हजार चौरस फुटांच्या कथित अनधिकृत बांधकामावर बुधवारी (दि. १९) कारवाई केल्यानंतर गुरुवारी (दि. २०) हाडके यांच्यासह रवींद्र घोरपडे यांच्या सुमारे ५ हजार चौरस फुटांच्या बांधकामावरही पीएमआरडीएने बुलडोझर चालवला. या धडक कारवाईमुळे लोणी काळभोर परिसरातील अनधिकृत बांधकामधारकांचे धाबे दणाणले असून, अनधिकृत प्लॉटिंग आणि होर्डिंग्ज चालकांमध्येही मोठी खळबळ उडाली आहे.

पीएमआरडीएची लोणी काळभोर परिसरातील ही आतापर्यंतची मोठी कारवाई मानली जात आहे. सलग दोन दिवस कारवाई सुरू राहिल्याने आता पुढचा नंबर कोणाचा? याची चर्चा परिसरात रंगली आहे.

पुणे-सोलापूर महामार्गालगत अनधिकृत बांधकामांचा पसारा
कवडीपाट येथील बंद पडलेला टोलनाका ते पाटस टोलनाका या पुणे-सोलापूर महामार्गाच्या पट्ट्यात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे, प्लॉटिंग आणि होर्डिंग्ज उभारण्यात आल्याची चर्चा आहे. महामार्गालगत अधिकृत होर्डिंग्जची संख्या तुलनेने कमी असताना अनधिकृत होर्डिंग्ज मोठ्या प्रमाणात असल्याचा दावा केला जात आहे. आता पीएमआरडीएने अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई सुरू केल्याने ‘कारवाईचा बुलडोझर आपल्यापर्यंत तर पोहोचणार नाही ना?’ अशी धाकधूक प्लॉटिंग व्यावसायिक आणि होर्डिंग चालकांमध्ये निर्माण झाल्याची चर्चा आहे.

अजून १५ हजारांहून अधिक चौरस फुटांवर कारवाईची शक्यता!
हेमंत हाडके आणि रवींद्र घोरपडे यांच्या बांधकामांवरील कारवाईनंतर त्याच परिसरातील आणखी सुमारे १४ हजार चौरस फुटांच्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई होणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यानंतर उरुळी कांचन परिसरातील एका व्यक्तीच्या सुमारे १ हजार चौरस फुटांच्या कथित अनधिकृत बांधकामावरही कारवाई होणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे ‘आपला तर नंबर नाही ना?’ अशी चर्चा आता अनधिकृत बांधकामधारकांमध्ये सुरू झाली आहे.
दरम्यान, पीएमआरडीएची कारवाई केवळ काही निवडक बांधकामांपुरती मर्यादित न राहता महामार्गालगतची अनधिकृत बांधकामे, प्लॉटिंग आणि होर्डिंग्ज यांच्यावरही समान निकषाने कारवाई होणार का, याकडे जिल्हाचे लक्ष लागले आहे.







