पुणे : पिंपरी-चिंचवडमधील काळेवाडी भागात एका अन्न पुरवठा करणाऱ्या कर्मचाऱ्यावर कोयता आणि पट्ट्याने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. डिलिव्हरी आयडी बंद पडल्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून ही हिंसक घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, सुंदरम लालचंद यादव (वय 25, रा. राहाटणी) हे ‘जिपीओ लॉजिस्टिक’ या फूड डिलिव्हरी कंपनीत काम करतात. त्यांचा डिलिव्हरी आयडी अचानक बंद झाल्यामुळे त्यांनी कंपनीच्या फिल्ड मॅनेजर आशु मॅडम यांच्याशी फोनवर संपर्क साधला. या संभाषणादरम्यान दोघांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली. या वादानंतर आशु मॅडमने सुंदरमला माफी मागण्याच्या बहाण्याने गुरुवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास काळेवाडीतील पाचपीर चौकात भेटायला बोलावले.

मात्र सुंदरम तिथे पोहोचताच आशु मॅडम, तिचा पती कांतीलाल आणि इतर साथीदार आधीच दबा धरून बसले होते. काही कळायच्या आतच आरोपी ओंकार याने धारदार कोयत्याने सुंदरमच्या डोक्यावर, हातावर आणि कानावर सपासप वार केले. तर इतर साथीदारांनी त्याला पट्ट्याने अमानुष मारहाण करून गंभीर जखमी केले.

या हल्ल्यात रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सुंदरम यांनी काळेवाडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. पोलिसांनी तातडीने पावले उचलत मुख्य सूत्रधार आशु मॅडम (रा. भोसरी) हिला अटक केली आहे. तिच्यासह पती कांतीलाल (रा. गव्हाणे वस्ती, भोसरी), ओंकार, सोहम, निखिल आणि राज यांच्याविरुद्ध प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.






