लोणी काळभोर, ता. 30 : थेऊर (ता. हवेली) येथे महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरवर दुरुस्तीचे काम करत असताना वरिष्ठ कंत्राटी कर्मचारी अशोक किसन जवळकर (वय 52, रा. आळंदी म्हातोबाची, ता. हवेली) यांचा विजेचा तीव्र धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाला. शुक्रवारी (ता. 29) सायंकाळी सव्वाचारच्या सुमारास ही घटना घडली. दुरुस्तीच्या कामासाठी अधिकृत परमिट घेऊन वीजप्रवाह बंद करण्यात आलेला असतानाही डीपीवर अचानक वीजप्रवाह कसा आला? या प्रश्नामुळे महावितरणच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, थेऊर परिसरातील 22 केव्हीच्या डीपीचा डीव गेल्याने तो बसविण्याचे काम सुरू होते. हे काम सुरू करण्यापूर्वी थेऊर सबस्टेशनकडून नियमानुसार परमिट घेण्यात आले होते. त्यानुसार संबंधित विद्युत प्रवाह बंद करण्यात आला होता. मात्र, अशोक जवळकर हे सुमारे 15 ते 20 फूट उंचीवरील डीपीवर चढून काम करत असताना अचानक त्यांना विजेचा धक्का बसला. त्यानंतर ते थेट खाली कोसळले.
जवळकर यांना सहकारी व स्थानिक नागरिकांच्या मदतीने तातडीने लोणी काळभोर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. जवळकर हे मागील 18 ते 19 वर्षांपासून थेऊर व परिसरात महावितरणची कामे करत होते.

दरम्यान, या दुर्घटनेनंतर परमिट घेतलेले असताना डीपीवर वीजप्रवाह सुरू कसा झाला, याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. महावितरणच्या कर्मचाऱ्यांमध्ये एखाद्या जनरेटरमधून ‘बॅक करंट’ आला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, ही केवळ प्राथमिक चर्चा असून, घटनास्थळाचा पंचनामा आणि तांत्रिक तपासानंतरच वीजप्रवाह नेमका कुठून आला, याचे कारण स्पष्ट होणार आहे.

दोन वर्षांत चार बळी
विशेष म्हणजे, लोणी काळभोर परिसरात मागील दोन वर्षांत विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याच्या घटनांमुळे सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. 19 मे 2025 रोजी एमआयटी शिक्षण संस्थेत हॉस्टेल अटेंडंट म्हणून कार्यरत असलेल्या शामल संतोष आगाव (वय 34) यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला होता. त्यानंतर 7 जून 2025 रोजी रायवाडी परिसरात विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे काम करत असताना महावितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ प्रज्ञापाल प्रकाशराव सोनसळे (वय 45) यांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला.
तसेच, 2 ऑगस्ट 2026 रोजी एमआयटी शैक्षणिक संकुलात काम सुरू असताना रोषण राजू चव्हाण (वय 22) या तरुणाचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला. त्यामुळे 2025 आणि 2026 या दोन वर्षांत एमआयटी शैक्षणिक संकुल आणि महावितरणशी संबंधित घटनांमध्ये चार जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर, वीजप्रवाह बंद करण्यासाठी घेतलेले परमिट प्रत्यक्षात कितपत सुरक्षित आहे? वीजपुरवठा पुन्हा सुरू होऊ नये यासाठी आवश्यक सुरक्षा यंत्रणा कार्यरत आहेत का? कर्मचाऱ्यांना पुरेशी सुरक्षा साधने उपलब्ध करून दिली जातात का? असे सवाल उपस्थित होत आहेत.
अशोक जवळकर यांच्या मृत्यूला नेमकी कोणती परिस्थिती कारणीभूत ठरली, याचा तांत्रिक तपास होणे गरजेचे आहे. दोष किंवा निष्काळजीपणा आढळल्यास संबंधितांवर कारवाई करावी आणि भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी सुरक्षा उपाययोजना अधिक कठोर कराव्यात, अशी मागणी परिसरातून होत आहे.







