लोणी कंद, ता. 29 : उधार दिलेले 500 रुपये परत मागितल्याच्या कारणावरून तिघांनी एका 40 वर्षीय तरुणाला लाथाबुक्क्यांनी, पीव्हीसी पाइपने मारहाण केल्याची घटना घडली. लोणीकंद (ता. हवेली) येथील रामनगर परिसरात गुरुवारी (ता. 22) घडली.

केशव श्रीराम काकडे असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार यांनी लोणीकंद पोलिस ठाण्यात परशराम कलाप्पा रेडेक (वय-26, रा. कटकेवाडी, ता. हवेली), प्रदिप सुभाष भगत (वय-26, रा. कटकेवाडी, ता. हवेली) भगवान गणेश गाडेकर, वय-26, रा. कटकेवाडी, ता. हवेली) तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केशव काकडे हे लोणीकंद येथील बालाजी वेअरहाऊसमध्ये मागील सहा महिन्यांपासून हाऊसकीपिंगचे काम करतात. 21 ऑक्टोबर रोजी रात्रीच्या ड्युटीदरम्यान त्यांच्यासोबत काम करणाऱ्या परशराम कलाप्पा रेडेकर याने दुसऱ्या दिवशी परत देण्याच्या बोलीवर 500 रुपये उधार घेतले होते.

गुरुवारी सकाळी ड्युटी संपल्यानंतर काकडे यांनी पैसे परत मागितले असता, परशराम याने थोड्या वेळात देतो, असे सांगून तेथून निघून गेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर त्याने फोन बंद केला. दुपारी कटकेवाडी फाटा येथे जेवण करत असताना परशरामने फोन करून महामार्गावर वाघोलीच्या दिशेने येण्यास सांगितले; मात्र काकडे यांनी नकार दिला.

दुपारी साडेतीनच्या सुमारास जेवण करून घरी जात असताना बालाजी वेअरहाऊससमोरील रस्त्यावर परशराम रेडेकर, प्रदीप भगत आणि भगवान गाडेकर यांनी काकडे यांना गाठले. शिल्पकार लॉ कॉलेजच्या भिंतीजवळ परशराम याने शिवी दिल्याबाबत जाब विचारला. त्यानंतर तिघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. काकडे खाली पडल्यानंतर त्यांना चपलेने मारहाण करण्यात आली, तर परशराम याने जवळ पडलेल्या पीव्हीसी पाइपने त्यांच्या पाठीत आणि डोक्यात मारल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
दरम्यान, यावेळी कंपनीतील कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी करून भांडण सोडविले. घटनेनंतर काकडे यांनी आपल्या बहिणीला आणि मेहुण्याला फोन करून माहिती दिली. वाघोली येथील सरकारी रुग्णालयात उपचारानंतर त्यांनी लोणीकंद पोलिसांकडे तक्रार दिली.






