बारामती: रब्बी हंगामासाठी शिरसाई उपसा सिंचन योजनेचे आवर्तन तातडीने सुरू करावे आणि लाभक्षेत्रातील सर्व गावांना समान पाणी मिळावे, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. गुरुवारी (29 ऑक्टोबर) सकाळी 10 वाजता उंडवडी सुपे येथील श्री संत तुकाराम महाराज पालखी तळावर बेमुदत चक्री उपोषणाला सुरुवात झाली. या आंदोलनात योजनेच्या लाभक्षेत्रातील 15 गावांमधील पाणी वापर संस्थांचे पदाधिकारी आणि शेतकरी प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.

खरीप हंगामात पाण्याचे योग्य नियोजन न झाल्यामुळे उंडवडी कडेपठार, बऱ्हाणपूर आणि गोजुबावी या गावांतील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळाले नसल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. आता रब्बी हंगाम सुरू झाला असून पिकांना पाण्याची गरज आहे. त्यामुळे खडकवासला कालव्यातून शिर्सुफळ तलावात पाणी सोडून शिरसाई योजना तातडीने सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
आंदोलन सुरू झाल्यानंतर परिसरातील विविध गावांतील शेतकऱ्यांनी उपोषणस्थळी भेट देत आंदोलनाला पाठिंबा दिला. पाणीवाटपाचे स्पष्ट नियोजन आणि प्रशासनाकडून लेखी आश्वासन मिळेपर्यंत उपोषण मागे न घेण्याचा निर्धार प्रतिनिधींनी व्यक्त केला.

शेतकऱ्यांच्या 6 प्रमुख मागण्या

शिरसाई योजनेचे रब्बी आवर्तन त्वरित सुरू करावे, सर्व 15 गावांना न्याय्य पद्धतीने पाणी द्यावे आणि शिर्सुफळ तलावातील पाण्याची निर्धारित पातळी व शेतकऱ्यांना मिळणाऱ्या पाण्याबाबत पाटबंधारे विभागाने लेखी माहिती द्यावी, अशा प्रमुख मागण्या आहेत.
याशिवाय, तलावात योजनेसाठी स्वतंत्र बांध उभारणे, पाण्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी गेज मीटर बसवणे आणि मुख्य पंपगृहासह तलाव परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची मागणीही करण्यात आली आहे.
छत्रपती पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष सतीश गोलांडे यांनी सांगितले की, 15 गावांच्या शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत आणि पाण्याचे ठोस नियोजन लेखी स्वरूपात मिळेपर्यंत बेमुदत चक्री उपोषण सुरू राहील. आता प्रशासन या मागण्यांवर काय भूमिका घेते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.






