पुणे : माथेरानला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी मध्य रेल्वेने एक आनंदाची बातमी दिली आहे. पावसाळ्याच्या विश्रांतीनंतर नेरळ ते माथेरान दरम्यान धावणारी लोकप्रिय ‘मिनी ट्रेन’ 30 ऑक्टोबर 2026(शुक्रवार) पासून पुन्हा प्रवाशांच्या सेवेत रुजू होत आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून दरवर्षी जून ते ऑक्टोबर या काळात ही सेवा स्थगित ठेवली जाते. आता पावसाळा संपल्याने पर्यटकांना घाटातील निसर्गरम्य प्रवासाचा आनंद घेता येईल.

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, या मार्गावर धावणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक आणि डब्यांची नवी रचना खालीलप्रमाणे असेल:
१. नेरळ ते माथेरान (डाउन गाड्या):

गाडी क्रमांक 52103: नेरळ येथून दररोज सकाळी 08.50 वाजता सुटेल आणि 11.30 वाजता माथेरानला पोहोचेल. (या गाडीत 3 द्वितीय श्रेणी, 1 विस्टाडोम आणि 2 लगेज व्हॅन डबे असतील.)

गाडी क्रमांक 52105: नेरळ येथून दररोज सकाळी 10.25 वाजता निघून दुपारी 13.05 वाजता माथेरानला पोहोचेल. (या गाडीत 3 द्वितीय श्रेणी, 1 प्रथम श्रेणी आणि 2 लगेज व्हॅन डबे असतील.)
२. माथेरान ते नेरळ (अप गाड्या):
गाडी क्रमांक 52104: माथेरान येथून दररोज दुपारी 14.45 वाजता सुटेल आणि 17.30 वाजता नेरळला पोहोचेल.
गाडी क्रमांक 52106: माथेरान येथून दररोज दुपारी 16.00 वाजता निघून सायंकाळी 18.40 वाजता नेरळला पोहोचेल.
अमन लॉज ते माथेरान शटल सेवा
अमन लॉज ते माथेरान दरम्यानची नियमित शटल सेवा नेहमीप्रमाणेच सुरू राहील. दररोज या मार्गावर दोन्ही बाजूंनी 6 फेऱ्या चालविल्या जातील. अमन लॉजवरून पहिली फेरी सकाळी 08.45 वाजता, तर शेवटची फेरी सायंकाळी 17.45 वाजता सुटेल. माथेरानवरून पहिली फेरी सकाळी 08.20 वाजता, तर शेवटची फेरी सायंकाळी 17.20 वाजता निघेल.
शनिवार आणि रविवारी पर्यटकांची गर्दी लक्षात घेता अतिरिक्त विशेष फेऱ्या चालवल्या जातील. अमन लॉजवरून सकाळी 10.30 आणि दुपारी 13.35 वाजता, तर माथेरानवरून सकाळी 10.05 आणि दुपारी 13.10 वाजता या विशेष गाड्या सुटतील.






