मुंबई: पॅकेज केलेले खाद्यपदार्थ आणि पेयेच्या पॅकेजिंगमध्ये महत्त्वाचा बदल होण्याची शक्यता आहे. एखाद्या पदार्थात साखर, मीठ किंवा फॅटचे प्रमाण जास्त असल्यास त्याची माहिती पॅकेजवर ठळकपणे देण्याचा प्रस्ताव भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण म्हणजेच FSSAI ने मांडला आहे.

या प्रस्तावानुसार, जास्त साखर, मीठ किंवा फॅट असलेल्या उत्पादनांच्या पॅकेजिंगवर लाल षटकोनी चिन्ह वापरले जाऊ शकते. त्यासोबत ‘HIGH SUGAR’, ‘HIGH SALT’ किंवा ‘HIGH FAT’ अशी स्पष्ट सूचना देण्याची योजना आहे. ही चेतावणी नियमित पोषणमूल्यांच्या तक्त्यापेक्षा मोठ्या अक्षरात आणि सहज दिसेल अशा पद्धतीने छापण्याचा प्रस्ताव आहे.

या विषयावर ‘3S And Our Health Society’ या संस्थेने सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. पॅकेज खाद्यपदार्थांवर फ्रंट-ऑफ-पॅक चेतावणी लेबल बंधनकारक करण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.

सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने FSSAI ला या प्रकरणात लवकर निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर FSSAI ने न्यायालयात अनुपालन प्रतिज्ञापत्र सादर करत प्रस्तावित नियमांची माहिती दिली आहे.
नवे नियम लागू करण्याची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने राबवण्याचा विचार आहे. मात्र, प्रत्येक खाद्यपदार्थावर अशा प्रकारचे चेतावणी चिन्ह लावले जाणार नाही. तूप, खाद्यतेल, मीठ, साखर, गूळ आणि मध यांसारख्या एकाच घटकावर आधारित आवश्यक पदार्थांना या नियमातून वगळण्याचा प्रस्ताव आहे.
हा प्रस्ताव लागू झाल्यास ग्राहकांना दुकानात किंवा ऑनलाइन पॅकेज्ड फूड खरेदी करण्यापूर्वी त्यातील साखर, मीठ आणि फॅटचे प्रमाण जास्त आहे की नाही, हे पटकन समजू शकणार आहे. त्यामुळे खाद्यपदार्थ निवडताना ग्राहकांना अधिक माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मदत होऊ शकते.






