लोणी काळभोर, ता. ३० : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भरधाव एसटी बसने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एका ३० वर्षीय विवाहितेचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (ता. ३०) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील इंडियन ऑईल कंपनीजवळ घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

शिवानी प्रतीक लोंढे (वय ३०, रा. मांजरी, ता. हवेली, मूळ रा. बावी अ, ता. बार्शी, जि. सोलापूर) असे अपघातात मृत्यू झालेल्या विवाहितेचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवानी लोंढे या आपल्या जावेसोबत दुचाकीवरून राईल हॉस्पिटलकडे जात होत्या. त्यांची दुचाकी कदमवाकवस्ती येथील इंडियन ऑईल कंपनीजवळ आली असता, उदगीर आगाराच्या ७०६३ क्रमांकाच्या एसटी बसने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, शिवानी यांच्या अंगावरून एसटी बसचे चाक गेले. त्यामुळे त्या गंभीर जखमी झाल्या.

अपघातानंतर त्यांना तातडीने लोणी काळभोर येथील शिवम हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले. या दुर्दैवी घटनेमुळे लोंढे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.







