पुणे : मद्यप्राशन करून वाहन चालवल्याच्या आरोपावरून पुणे पोलीस दलातील ३९ वर्षीय महिला पोलीस कर्मचारी अश्विनी केकाण यांना निलंबित करण्यात आले आहे. मांजरी परिसरातील या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलीस प्रशासनाने कारवाई केली. या प्रकरणी २७ ऑक्टोबर रोजी पोलीस कर्मचारी रामेश्वर थोरात यांच्या तक्रारीवरून मांजरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अश्विनी केकाण या काळेपडळ पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. शेवाळवाडी येथील रामानंद हॉटेलसमोरील रस्त्यावर ही घटना घडली. त्या वेळी त्या पोलीस गणवेशात होत्या. त्यांनी मद्यप्राशन करून राखाडी रंगाची मारुती सुझुकी बलेनो कार चालवल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या कारला नंबर प्लेटही नव्हती. त्यांनी रस्त्यावरून विरुद्ध दिशेने गाडी चालवत समोरून येणाऱ्या वाहनांना कट मारला. त्यानंतर गाडी थेट फुटपाथवर चढवली.
या प्रकारामुळे परिसरात गोंधळ निर्माण झाला. संबंधित महिला कर्मचाऱ्याने नागरिकांना शिवीगाळ केल्याचाही आरोप आहे. उपस्थित नागरिकांनी विचारणा केली असता त्यांनी मद्यपान केल्याचे मान्य केल्याचे व्हायरल व्हिडिओमध्ये ऐकू येत असल्याचे सांगितले जात आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाल्यानंतर प्रकरण चर्चेत आले.


घटनेची गंभीर दखल घेत पोलीस उपायुक्त जीवन बेनिवाल यांनी संबंधित महिला कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तिला निलंबित करण्यात आल्याची माहिती दिली. ससून रुग्णालयात करण्यात आलेल्या वैद्यकीय तपासणीच्या अहवालात तिने मद्यप्राशन केल्याचे निष्पन्न झाल्याचे समोर आले आहे. निलंबनाच्या आदेशातही या वैद्यकीय अहवालाचा उल्लेख करण्यात आला आहे.
दरम्यान, पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, घटनेच्या आधी संबंधित कर्मचारी रविवारी आणि सोमवारी कर्तव्यावर नव्हती. घटनेपूर्वी ती बंडगार्डन परिसरात मित्र-मैत्रिणींसोबत पार्टीसाठी गेली होती का, याचाही तपास केला जात आहे. तिने नेमके कुठे आणि कधी मद्यप्राशन केले, याची माहिती पोलीस घेत आहेत.
पोलीस दलातील कर्मचाऱ्याकडूनच वाहतूक नियमांचे उल्लंघन झाल्याने या घटनेची चर्चा सुरू आहे. व्हायरल व्हिडिओ, प्रत्यक्षदर्शींचे जबाब आणि इतर उपलब्ध पुराव्यांच्या आधारे मांजरी पोलीस पुढील तपास करीत आहेत.







