पुणे: देशातील नोटांच्या वापरात आगामी काळात महत्त्वाचा बदल होण्याची शक्यता आहे. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक म्हणजेच पॉलीमर नोटांची चाचणी सुरू करण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त समोर आले आहे. 1 एप्रिल 2027 पासून या प्रायोगिक प्रकल्पाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. या अंतर्गत दोन्ही मूल्यांच्या प्रत्येकी 100 कोटी नोटा छापण्याची योजना असल्याचे सांगितले जात आहे.

10 आणि 20 रुपयांच्या नोटांचा वापर रोजच्या व्यवहारांमध्ये मोठ्या प्रमाणात होतो. वारंवार हाताळणी होत असल्याने कागदी नोटा लवकर फाटतात. त्यामुळे त्यांची वारंवार छपाई करावी लागते. पॉलीमर नोटा तुलनेने अधिक टिकाऊ असतात. त्यामुळे दीर्घकाळात नोटांच्या छपाईवरील खर्च कमी होण्यास मदत मिळू शकते. दरम्यान, RBI सुरुवातीला मर्यादित स्वरूपात या नोटा बाजारात आणून त्यांचा वापर तपासणार आहे.
वृत्तानुसार, प्लास्टिक नोटांची चाचणी सुरू झाली तरी सध्याच्या 10 आणि 20 रुपयांच्या कागदी नोटा बंद होणार नाहीत. त्या पूर्वीप्रमाणेच वैध राहतील. नव्या पॉलीमर नोटा आणि जुन्या कागदी नोटा एकाच वेळी चलनात वापरता येतील.







