डॉ. अशोक बालगुडे

पुणे: खुर्ची एक, सत्ता एक आणि युतीही एक; पण नेत्यांच्या तोंडात मात्र एकमेकांसाठी अंगार! महायुतीचे नेते सत्तेच्या पंगतीत शेजारी बसतात आणि समाजमाध्यमांच्या आखाड्यात एकमेकांचे वस्त्रहरण करतात. विधान परिषद निवडणुकीनंतर सुरू झालेल्या नवनाथ बन विरुद्ध महायुतीतील काही नेत्यांच्या संघर्षात आता रवींद्र धंगेकर यांनी ‘नसबंदी’चा उल्लेख करत उडी घेतली आहे. राजकारणाचा हा आखाडा आहे की वैयक्तिक अपमानाचा जाहीर बाजार, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.
भाजपचे नेते निलेश राणे यांनी यापूर्वी बन यांच्यावर ‘लायकी’चा टोला लगावला होता. त्यानंतर धंगेकर यांनी समाजमाध्यमांवर व्यंगचित्र पोस्ट करत बन यांना लक्ष्य केले. चित्राच्या पार्श्वभूमीवर भाजपचे कार्यालय आणि कमळाचे चिन्ह दाखविण्यात आले आहे. त्यासोबतच्या मजकुरात धंगेकर यांनी बन यांच्याबद्दल अपमानास्पद भाषा वापरली असून, ‘कधी तुझी नसबंदी होईल, हे तुला कळणारही नाही,’ असा मजकूर लिहिला आहे. ‘बनश्वान’, ‘चिल्ला पुकार’ आणि ‘पेड अॅनिमल’ असे हॅशटॅगही जोडले आहेत.

राजकारणात विरोधकांवर टीका करणे समजू शकते; पण सत्तेतल्या सहकाऱ्यांनाच लक्ष्य करण्यासाठी भाषेची अशी घसरण कशासाठी? एकीकडे महायुतीची एकजूट दाखवायची आणि दुसरीकडे त्याच युतीतील नेत्यांनी एकमेकांना समाजमाध्यमांवर धारेवर धरायचे, हा राजकीय दुटप्पीपणा आता लपून राहिलेला नाही.

निवडणुकीच्या निकालानंतर सुरू झालेला हा संघर्ष केवळ दोन नेत्यांमधील शाब्दिक चकमक राहिलेला नाही. घटक पक्षांमधील समन्वय, नेतृत्वाचे नियंत्रण आणि सार्वजनिक जीवनातील भाषेची मर्यादा या प्रश्नांनाही त्याने ऐरणीवर आणले आहे. पक्षश्रेष्ठी या वादात मध्यस्थी करणार का, बन यांचे प्रत्युत्तर काय असेल आणि महायुतीतील ही कुस्ती थांबणार की आणखी रंगणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
जनतेला विकासाची उत्तरे हवी आहेत; नेत्यांकडून मात्र शिव्यांची आतषबाजी सुरू आहे. सत्तेचा संसार टिकवायचा असेल, तर आधी शब्दांचा संसार सावरावा लागेल, एवढे तरी या नेत्यांना कोण सांगणार?







