पुणे : मित्रासोबत झालेल्या वादानंतर घरी परतलेल्या रिक्षाचालकाचा काही वेळाने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना भवानी पेठेतील काशेवाडी परिसरात घडली. सुरुवातीला चक्कर येत असल्याने आणि अशक्तपणा जाणवत असल्याने संबंधित व्यक्ती घरी जाऊन झोपली होती. मात्र, पुन्हा झोपेतून उठलेच नाही. शवविच्छेदनातून डोक्याला झालेल्या मारामुळे अंतर्गत रक्तस्राव झाल्याचे समोर आले. यानंतर पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करत अमोल अनिल अंबवणे (वय 26) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

असलम युसुफ खान (वय 30) असे मृत रिक्षाचालकाचे नाव आहे. ते काशेवाडी परिसरात राहत होते. असलम यांचे भाऊ मुझम्मील युसुफ खान यांनी खडक पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.
30 ऑक्टोबरच्या रात्री 11 ते 11.30 च्या सुमारास मनशहा दर्ग्याजवळ ही घटना घडली. असलम रिक्षा चालवण्यासोबतच वाहन दुरुस्तीचे कामही करत होते. घटनेच्या वेळी ते आणि अमोल एकाच ठिकाणी बसले होते. त्यांच्यात कोणत्या तरी कारणावरून वाद सुरू झाला. बोलाचाली वाढल्यानंतर दोघांमध्ये मारहाण झाली.

पोलिसांच्या माहितीनुसार, वादादरम्यान असलम यांनी जवळची वीट अमोलला मारली. त्यानंतर अमोलने तीच वीट असलम यांच्या डोक्याच्या मागील बाजूस मारल्याचा आरोप आहे. एवढेच नव्हे, तर दगडानेही त्यांना मारहाण करण्यात आली. या प्रकारानंतर असलम घरी परतले. मात्र, जबर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट झाले असून, खडक पोलीस पुढील तपास करत आहेत.







