पुणे : छत्रपती शिवाजी महाराज नगर न्यायालय परिसरात एका वकिलाला 4 जणांनी मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. रस्त्यावरून बाजूला होण्यास सांगितल्याच्या किरकोळ कारणावरून हा वाद सुरू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेमुळे न्यायालय परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित वकील न्यायालय परिसरात असताना रस्त्यावरून बाजूला होण्यावरून त्यांचा काही जणांशी वाद झाला. सुरुवातीला झालेल्या शाब्दिक वादाचे पुढे हाणामारीत रूपांतर झाले. यावेळी चार जणांनी एकत्र येत वकिलाला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या हल्ल्यात वकील जखमी झाले असून, आरोपींनी त्यांना जीवे मारण्याची धमकीही दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आल्याची माहिती आहे. घटनेनंतर संबंधित वकिलांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाची नोंद घेण्यात आली असून, तक्रारीतील आरोपांची पडताळणी केली जात आहे. वाद नेमका कशामुळे झाला, मारहाणीत कोणाचा सहभाग होता आणि धमकी देण्यात आली का, याचा तपास पोलीस करत आहेत.









