जेजुरी, ता. 2 : नीरा (ता. पुरंदर) येथे एका व्यावसायिकाच्या दुकानासमोरील बॅनरवर पेट्रोल ओतून आग लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेत दुकानाच्या जाहिरात फलकाचे सुमारे सहा हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. अमन हमीद सय्यद आणि सार्थक महेश धायगुडे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेट. याप्रकरणी संजय रमेश राजपुरोहित (वय 38 , रा. कृष्णकुंज सोसायटी, नीरा) यांनी जेजूरी पोलिसांत फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजपुरोहित यांचे नीरा येथील सीटी सेंटरच्या मागील बाजूस ‘शृंगार गिफ्ट हाऊस अँड बेंटेक्स ज्वेलरी’ नावाचे दुकान आहे.शनिवारी (ता. 31 ऑक्टोबर) रात्री नऊच्या सुमारास राजपुरोहित यांनी नेहमीप्रमाणे दुकान बंद करून घरी गेले होते. रात्री अकराच्या सुमारास त्यांचे भाऊ मुकेश यांनी फोन करून दुकानासमोरील काहीतरी जळत असल्याची माहिती दिली. त्यानंतर राजपुरोहित यांनी घटनास्थळी धाव घेतली असता दुकानाच्या नावाचा बॅनर जळत असल्याचे निदर्शनास आले.
त्यानंतर दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, दोन तरुण प्लास्टिकच्या बाटलीत पेट्रोल घेऊन दुकानासमोर आले. त्यांनी दुकानासमोर एक फेरी मारल्यानंतर बॅनरवर पेट्रोल ओतून त्याला आग लावल्याचे फुटेजमध्ये दिसून आल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. या आगीत बॅनरचे सुमारे सहा हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

दरम्यान, या प्रकरणी अमन हमीद सय्यद (रा. घुले कॉलनी, नीरा) आणि सार्थक महेश धायगुडे (रा. नीरा) यांच्याविरोधात कायदेशीर तक्रार दाखल करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार चौधरी करीत आहेत.








