पुणे : पुणेकरांची बहुप्रतीक्षित मेट्रो सेवा अखेर सुरू होण्याचा मुहूर्त ठरला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या, ३ नोव्हेंबर रोजी ऑनलाइन माध्यमातून पुणे मेट्रोच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन करणार आहेत. सुमारे २१ हजार ८०० कोटी रुपयांच्या या प्रकल्पांमध्ये पुणे मेट्रोच्या पिंक लाईनचे उद्घाटन आणि मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याची पायाभरणी होणार आहे. यामुळे पुणे शहरासह पिंपरी-चिंचवडमधील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होण्याची अपेक्षा आहे.

पुणे मेट्रोची लाईन ३ अर्थात पिंक लाईन हा सुमारे ८ हजार ३०० कोटी रुपयांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या मार्गिकेमुळे हिंजवडीतील राजीव गांधी आयटी पार्क थेट शिवाजीनगरशी जोडले जाणार आहे. त्यामुळे आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांसह नियमित प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या मेट्रो मार्गिकेचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण संचालन महिला ट्रेन ऑपरेटर करणार आहेत. तसेच मेट्रोच्या एकूण विजेच्या गरजेपैकी सुमारे ३० टक्के वीज सौरऊर्जेतून उपलब्ध होणार आहे. त्यामुळे महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन मिळण्यासोबतच पर्यावरणपूरक वाहतुकीलाही चालना मिळणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचीही पायाभरणी करणार आहेत. सुमारे १३ हजार ५०० कोटी रुपये खर्चाच्या या टप्प्यात लाईन २ए, २बी, ४ आणि ४ए या मार्गिकांचा समावेश आहे. या नव्या मार्गांमुळे शहरातील प्रमुख निवासी भाग, व्यावसायिक केंद्रे आणि आयटी हब मेट्रोच्या जाळ्याशी जोडले जाणार आहेत.

मेट्रोच्या विस्तारामुळे रस्त्यांवरील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच नागरिकांचा प्रवासाचा वेळ वाचणार असून पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील कनेक्टिव्हिटी अधिक सुधारण्याची अपेक्षा आहे.
पहिला टप्पा :
– माण ते आर. के. लक्ष्मण संग्रहालय (बाणेर)
– स्थानके : १२
– लांबी : १३.३ किलोमीटर
दुसरा टप्पा :
– बालेवाडी हायस्ट्रीट ते जिल्हा न्यायालय
– स्थानके : ११
– लांबी : १० किलोमीटर
हिंजवडीतील राजीव गांधी आयटी पार्कला पुण्याच्या मध्यवर्ती भागाशी जोडणारी ही पुण्यातील तिसरी मेट्रो मार्गिका आहे. हा प्रकल्प सार्वजनिक-खासगी भागीदारीत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आणि पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड यांच्या माध्यमातून राबवण्यात येत आहे.
या मेट्रो सेवेचे उद्घाटन गेल्या वर्षी मार्चमध्ये होणे अपेक्षित होते. मात्र, प्रकल्पातील कामे अपूर्ण असल्याने सेवा सुरू होण्यास विलंब झाला. आता अखेर या बहुप्रतीक्षित मेट्रो मार्गिकेच्या उद्घाटनाचा मुहूर्त ठरल्याने पुणेकरांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.







