पुणे : पुण्यात परवडणाऱ्या दरात स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांनी म्हाडाच्या घरांसाठी अक्षरशः गर्दी केली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेल्या ४ हजार ४६२ सदनिकांच्या सोडतीसाठी तब्बल ३ लाख २५ हजार ७७ अर्ज प्राप्त झाले आहेत. म्हाडाच्या इतिहासातील ही आतापर्यंतची विक्रमी अर्जसंख्या असल्याचे सांगण्यात येत आहे. या सोडतीकडे आता हजारो नागरिकांचे लक्ष लागले असून, डिसेंबर २०२६ च्या पहिल्या आठवड्यात सोडत काढण्यात येणार आहे.

प्राप्त झालेल्या एकूण अर्जांपैकी २ लाख ७३ हजार ९७४ अर्जदारांनी अनामत रक्कम भरून सोडतीतील सहभाग निश्चित केला आहे. या अर्जदारांकडून सुमारे ५६४ कोटी रुपयांची अनामत रक्कम जमा झाली आहे. परवडणाऱ्या घरांसाठी नागरिकांमध्ये असलेली मोठी मागणी या आकडेवारीतून स्पष्ट होत आहे.
पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीए क्षेत्रात घरे

म्हाडाच्या पुणे मंडळाने २४ ऑगस्ट रोजी १५ टक्के सामाजिक गृहनिर्माण आणि २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनांतर्गत सदनिकांच्या वितरणासाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती.

या सोडतीमध्ये पुणे महापालिका हद्दीतील १ हजार ४६८, पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील १ हजार ४०६, तर पीएमआरडीए क्षेत्रातील १ हजार ५८८ सदनिकांचा समावेश आहे. अशा एकूण ४ हजार ४६२ घरांसाठी ही सोडत होणार आहे. यामध्ये मागील दोन सोडतींमधील ५५८ शिल्लक सदनिकांचाही समावेश करण्यात आला आहे.
फेब्रुवारी महिन्यात झालेल्या म्हाडाच्या सोडतीसाठी २ लाख १५ हजार ८४७ अर्ज प्राप्त झाले होते. यंदा अर्जांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून, अनामत रक्कम भरून सहभाग निश्चित करणाऱ्या अर्जदारांची संख्या मागील सोडतीच्या तुलनेत सुमारे ५८ हजारांनी अधिक आहे.
पुणे आणि परिसरात घरांच्या किमती सातत्याने वाढत असताना म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांना मिळालेला हा प्रतिसाद लक्षवेधी ठरत आहे. आता डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या सोडतीत कोणाचे घराचे स्वप्न पूर्ण होणार, याची उत्सुकता नागरिकांना लागली आहे.







