पुणे, दि. २ नोव्हेंबर : दिवाळीचा सण म्हणजे प्रकाश, आनंद आणि उत्साहाची पर्वणी. मात्र, क्षणिक आनंदासाठी फटाके उडविताना केलेली थोडीशी निष्काळजीदेखील आयुष्यभराचा अंधार निर्माण करू शकते. विशेषतः डोळ्यांना होणाऱ्या दुखापती या अत्यंत गंभीर स्वरूपाच्या असतात. फटाक्यांची ठिणगी, धूर, जळते कण किंवा उडणारे तुकडे डोळ्यांत गेल्यास दृष्टीला कायमस्वरूपी धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे फटाके उडविताना डोळ्यांचे संरक्षण करणे ही केवळ खबरदारी नसून अत्यावश्यक जबाबदारी आहे, असा सल्ला नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. महेश गडचे यांनी दिला आहे.

नेत्ररोगतज्ज्ञ म्हणून काम करताना फटाक्यांमुळे डोळ्यांना गंभीर इजा झालेल्या अनेक रुग्णांवर उपचार आणि शस्त्रक्रिया करण्याचा अनुभव आला आहे. अशा दुखापती केवळ वेदनादायक नसतात, तर काही प्रकरणांत रुग्णाची दृष्टी कायमची जाण्याची शक्यता असते. त्यामुळे डोळ्यांना इजा झाल्यानंतर वेळ न दवडता वैद्यकीय उपचार घेणे महत्त्वाचे आहे.
फटाके फोडताना शक्यतो प्रमाणित संरक्षक चष्म्याचा वापर करावा. फटाके पेटविताना सुरक्षित अंतर राखावे. जमिनीवर फिरणारे किंवा प्रकाश देणारे फटाके हातात धरून पेटवू नयेत. लहान मुलांना फटाके उडविण्यासाठी एकटे सोडू नये. पालकांनी त्यांच्यासोबत प्रत्यक्ष उपस्थित राहून सुरक्षिततेची काळजी घ्यावी. विशेषतः काचेच्या बाटल्या, डबे किंवा बंदिस्त भांड्यांमध्ये फटाके उडविण्याचा प्रकार टाळावा. स्फोटामुळे काचेचे किंवा अन्य पदार्थांचे तुकडे वेगाने उडून डोळ्यांत घुसण्याचा धोका असतो.

डोळ्यांना इजा झाल्यास काय कराल?
फटाक्यामुळे डोळ्याला दुखापत झाल्यास डोळा चोळणे, दाब देणे किंवा घट्ट पट्टी बांधणे टाळावे. डोळ्यांत गुलाबजल, घरगुती पदार्थ किंवा वैद्यकीय सल्ल्याशिवाय कोणतेही औषध टाकू नये. विशेषतः औषधांच्या दुकानातून स्वतःच्या मनाने स्टिरॉइडयुक्त थेंब घेऊन वापरणे धोकादायक ठरू शकते. डोळ्याला गंभीर इजा झाल्याची शक्यता असल्यास त्यावर कोणताही दबाव न देता तातडीने नेत्ररोगतज्ज्ञांकडे किंवा जवळच्या रुग्णालयातील आपत्कालीन विभागात जावे. डोळ्याला रासायनिक पदार्थाचा संपर्क झाल्यास तातडीने स्वच्छ पाण्याने धुणे आणि वैद्यकीय मदत घेणे आवश्यक आहे.

डोळ्यांची दृष्टी ही अनमोल संपत्ती आहे. फटाक्यांच्या काही क्षणांच्या रोषणाईसाठी या संपत्तीला धोका पत्करणे शहाणपणाचे नाही. दिवाळीचा आनंद फटाक्यांच्या आवाजात नव्हे, तर कुटुंबीयांच्या सुरक्षित हास्यात आहे. त्यामुळे स्वतःची आणि कुटुंबीयांची काळजी घेत जबाबदारीने दिवाळी साजरी करा, असे आवाहन डॉ. महेश गडचे यांनी केले आहे






