भिगवण : भिगवणकरांना हल्ली सगळ्यात मोठा कोणता प्रश्न भेडसावत असेल तर तो म्हणजे वीज घटकाचा. हल्ली भिगवणला येणारी वीज ही आली म्हणेपर्यत गायब होते आहे. पाऊसाची चाहूल लागताच पाऊसाच्या आदी वीज वितरण करणारे भिगवणचे कर्मचारी अलर्ट होऊन वीज गायब करून बाहेर पाऊसाच्या धारा पडो अथवा न पडो, मात्र वीज ग्राहकांना मात्र घामाच्या धारा नक्की लागलेल्या असतात. पाऊस सुरू होईपर्यत भिगवण विद्युत मंडळाचे कर्मचारी वीज घालविण्यासाठी मोठी तत्परता दाखवून परिसरातील वीज गुल करत असतात, यामागे त्यांचे गुपित काय? हे कुणाला सांगता येणार नाही.
जेवढी तप्तरता हे वीज घालविण्यासाठी दाखवितात तेवढी तत्परता हे दुरुस्तीबाबत दाखवित नाही. वीज बिल भरण्यास थोडा जरी उशीर झाला, तरी वीजेचे कनेक्शन तोडण्यास हे वीजेच्या वेगाने चपळाई दाखवितात. तेवढी चपळाई दुरुस्तीत दाखविली तर? गेली पाच सहा महिने दुरुस्तीच्या नावाखाली सतत वीज घालविणे हे भिगवण परिसरात नित्याचेच बनले आहे. त्यामुळे भिगवण बाजारपेठेतील वीजेवर अवलंबुन असणारे व्यावसायिक पूर्णपणे वैतागले असून त्यांचे या वीजेच्या लपंडावामुळे मोठे नुकसान होत आहे.
परंतु भिगवण विद्युत मंडळाचे अधिकारी मात्र यांना याचे काही देणेघेणे नसल्यासारखे सतत वीज घालवुन मात्र या व्यापाऱ्यावर एक प्रकारचा अन्यायच करीत आहेत. एक महिना वीज वापरली तर जेवढा विजवाहक कर आकारला त्याचे गणित केले, तर महिन्याचे 30 दिवस सातत्यपूर्ण वीज दिली जाते का? काही दिवस तर 4-5 तास लाईट गायब होते. तर गुरुवारी दुरुस्तीच्या नावाखाली दिवसभर वीज गायब असते. त्यामुळे काही व्यापाऱ्यांनी तर गुरुवार हा सुट्टीचा दिवस म्हणून जाहीर केला आहे. अजून किती दिवस दुरुस्ती व देखभालीच्या नावाखाली भिगवण विद्युत पुरवठामंडळ यांनी चालविलेला हा विजेचा खेळखंडोबा कधी थांबणार? हे विजमंडळच सांगेन व या त्रासातून भिगवणकरांची सुटका करतील जेणेकरून वीज बिल भरतानाही ग्राहकांना समाधान वाटेल.