पुणे : पुण्यात गेले काही दिवस झाले गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ झालेली दिसून येत आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था आहे की नाही अशी परिस्थिती निर्माण झालीय आहे. पुण्यामध्ये गेल्या २४ तासात दोन गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत. उरुळी कांचन इथं जमिनीच्या व्यवहारातून शनिवारी गोळीबार झाला होता. त्यानंतर आता अशीच एक गोळीबाराची घटना समोर आली आहे. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला असून एक गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. खानापूर जवळच्या घेरा सिंहगड गावच्या हद्दीत ही घटना घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, खडकवासला येथून दहा किलोमीटरवर असलेल्या खानापूर गावात पूर्व वैमनस्यातून शनिवारी मध्यरात्री दोन गटात गोळीबाराची घटना घडली आहे. यामध्ये, एक जणाचा मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी झाला आहे. जखमीवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. परिस्थिती पुन्हा आता बाहेर जाऊ नये म्हणून पुणे ग्रामीण पोलिसांकडून गावात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पुणे-पानशेत रस्त्यावरील बाजारपेठ असलेल्या या गावात शनिवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास खानापूर ते सांबरेवाडी रस्त्यावर ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.
खानापूर गावातीलच हे दोन गट असून पूर्व वैमनस्यातून एका गटाकडून आधी गोळीबार करण्यात आला. त्याला प्रत्युत्तर म्हणून दुसऱ्या बाजूने देखील गोळीबार करण्यात आला. गोळीबारानंतर दोन्ही गटातील व्यक्ती फरार झाले आहेत. या प्रकरणामागील नेमकं कारण काय? याची माहिती अद्याप मिळू शकली नाही आहे. गोळीबाराच्या आवाजामुळे या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. यामुळे ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी मोठा बंदोबस्त ठेवला आहे.