गणेश सुळ
केडगाव : उन्हाच्या कडाक्यात कलिंगडाला सोन्याचा भाव आला होता. त्यामुळं कलिंगड उत्पादक शेतकरी आनंदात होता. चांगले उत्पादन मिळेल, अशी अपेक्षा देखील शेतकऱ्यांना होती. मात्र, अचानक पाणी कमी पडू लागले. दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली, त्यामुळं शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका बसला. लागवडीसाठी केलेला खर्चही निघणे अवघड झालं आहे.
दौंड तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी कलिंगडाची लागवड केली होती. लागवडीपासून ते काढणीपर्यंत लाखो रुपयांचा खर्च केला होता. परंतु कलिंगड काढणीला येण्याअगोदर एक-दोन पाण्याची आवश्यकता असताना विहिरी, ओढे, नाले, तलाव, कूपनलिका कोरड्या पडण्यास सुरुवात झाली. त्यामुळं कलिंगड पिकाला पाणी मिळत नसल्याने पीकाची शेतातच नासाडी होत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
कलिंगडला चांगला बाजारभाव मिळून दोन पैसे हातात येतील, या आशेने शेतकरी दिवसरात्र एक करुन कलिंगडाचे संगोपन करत होते. त्यांच्या कष्टाला यशही मिळाले. मात्र, शेवटी एक दोन पाण्याअभावी कलिंगडाची अक्षरशः नासाडी झाली.
दरम्यान, दिवसरात्र मेहनत घेऊन उत्पादन घेतलेल्या कलिंगड लागवडीतून चांगले आर्थिक उत्पादन अपेक्षित होते. रात्रदिवस काबाड कष्ट करुन शेतकऱ्यांनी जोमात पीक आणले होते. या कलिंगड पिकातून लाखांचे उत्पादन अपेक्षित होते. मात्र, बाजारपेठेत कलिंगडला चांगला भाव मिळत आहे. पण, पाण्याअभावी त्यांच्या अपेक्षाभंग झाल्या आहेत. त्यामुळे कलिंगडाच्या वजनात वाढ होईना. या दुष्काळजन्य परिस्थितीने, लागवड केलेला खर्चही निघत नसल्याचे चित्र आहे.
पाण्याची मागणी करूनही पाणी नाही
दोन दिवसांपूर्वी खडकवासला धरणातून पाणी दौंड तालुक्यात पोहचले होते. परंतु, आम्ही पाण्याची मागणी करून देखील आम्हाला पाणी न देता इंदापूर तालुक्यात नेण्यात आले. पिकाची नासाडी होत आहे, शेवटी एका पाण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे कलिंगडाचे पीक जमीनदोस्त होत आहे. पिकाची केलेल्या खर्चाच्या तुलनेत वाढ होत नाही, असे पाटबंधारे विभाग यांना कळविण्यात आले होते.
– दादा खोमणे, शेतकरी गाडेवाडी (दौंड)
स्वतः माहिती घेऊन लक्ष देण्याचे आश्वासन
खडकवासला प्रकल्पातील धरणामध्ये अगोदरच पाणीसाठा कमी असताना देखील दौंड तालुक्यासाठी पाणी सोडण्यात आले. परंतु नियमानुसार अगोदर इंदापूरसाठी 25 दिवस पाणी सोडण्यात येते. त्यानतंर दौंड तालुक्यातील गावांना पाणी सोडण्यात येते. या शेतकऱ्याची गरज पाहून त्यासंदर्भात मी स्वतः माहिती घेऊन या विषयात लक्ष देते.
– श्वेता कुऱ्हाडे, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग पुणे (खडकवासला)