सासवड, ता. 18 : सासवड शहरातील गजबजलेल्या धान्य बाजार परिसरात चोरट्यांनी ज्वेलर्सचे दुकान फोडून तब्बल 3 लाख 36 हजार 600 रुपये किमतीच्या चांदीच्या वस्तूंवर डल्ला मारला. जैन मंदिराजवळील व्यंकटेश ज्वेलर्समध्ये 16 ऑक्टोबरच्या रात्री ते 17 ऑक्टोबरच्या सकाळदरम्यान ही चोरी झाली.

या प्रकरणी व्यंकटेश पोतदार यांच्या फिर्यादीवरून सासवड पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाजारपेठेतील दुकानाला लक्ष्य करण्यात आल्याने व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञात चोरट्यांनी व्यंकटेश ज्वेलर्सच्या दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश केला. त्यानंतर दुकानातील चांदीचे मुखवटे, मूर्ती, बाळी, टाक आणि चेन असा ऐवज चोरून नेला. चोरीला गेलेल्या वस्तूंची एकूण किंमत 3 लाख 36 हजार 600 रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या चोरीचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक राऊत करीत आहेत.








