लोणी काळभोर (पुणे) : महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार थेऊर (ता. हवेली) येथील प्रगतशील शेतकरी विजय एकनाथ कुंजीर यांना जाहीर झाला आहे. हवेली तालुक्यात प्रथमच महाराष्ट्र शासनाचा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार हा विजय कुंजीर यांना देण्यात येणार आहे. हा पुरस्कार राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूलमंत्री, कृषिमंत्री, राज्यमंत्री, कृषी सचिव, कृषी आयुक्त यांच्या प्रमुख उपस्थितीत दिला जातो.
विजय कुंजीर यांचे वडील एकनाथ कुंजीर हेही प्रगतशील शेतकरी आहेत. विजय कुंजीर यांनीही उच्च शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पॉलीहाऊसमधील ऑरचिड, अँथोरिअम, फिनॉलॉपसिस या हायटेक फुलशेतीकडे वळत फुलांची-झाडांची आयात-निर्यात करून जिल्ह्यात चांगला नावलौकिक केला आहे. हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर विजय कुंजीर व त्यांच्या परिवाराने आनंद व्यक्त केला. कुंजीर यांच्या निवडीने थेऊर मधील शेतकरी बांधवांनी समाधान व्यक्त केले.
दरम्यान, कृषी क्षेत्रात उल्लेखनीय व आदर्शवत काम करणाऱ्या प्रगतशील शेतकऱ्यांना, तालुका पंचायत समितीच्या शिफारशीने, जिल्हा परिषदेकडूनहि विजय कुंजीर यांना ‘कृषिनिष्ठ शेतकरी पुरस्कार’ मागील तीन वर्षापूर्वी देण्यात आला आहे.
याबाबत बोलताना प्रगतशील शेतकरी विजय कुंजीर म्हणाले, “शेतकरी भविष्यात हायटेक शेतीकडे वळाल्यास, शेतकऱ्याची आर्थिक सुबत्तेकडे वाटचाल होऊन, शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या थांबतील. यासाठी पुढील काळात हायटेक शेती करणारे शेतकरी निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार आहे”.