उरुळी कांचन : पुणे-सोलापुर महामार्गावर कोरेगाव मूळ ग्रामपंचायत हद्दीतील इनामदार वस्ती परिसरात दोन कंटेनर व पिकअपच्या तीहेरी अपघातात पिकअपमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर कंटेनरचालक जखमी झाला आहे. शनिवारी (ता. 03) सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे. अपघात एवढा भीषण होता कि, यामध्ये दोघांचा जागेवरच चेंदामेंदा झाला व जागेवरच मृत्यू झाला.
सुनील नवनाथ जाधव (वय – 27, रा. भांडगाव, ता. दौंड) व विजय चिल्या भिल, (रा. मराठी शाळेच्या पाठीमागे शिंदवणे, ता. हवेली, मूळ रा. आद्रत भैयडी, ता. शहादा, जि. नंदुरबार) असे अपघातात मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. तर कंटेनर चालकाचे नाव अद्याप कळू शकले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, सुनील जाधव हा पिकअप चालक असून विजय हा मजुरीचे काम करीत होता. सुनील जाधव हा पिकअपमध्ये उसाचे वाडे घेऊन पुण्याच्या बाजूला निघाला होता. त्याच्या बाजूला विजय भिल हा बसलेला होता. शनिवारी सकाळी उसाचे वाडे घेऊन जात असताना इनामदारवस्ती परिसरात एक कंटेनर ट्रक महामार्गावर वळण घेण्यासाठी थांबला होता.
पुण्याकडे जाताना अचानक ट्रक थांबल्याने सुनीलचा पिकअपवरील ताबा सुटला व जाऊन समोरील ट्रकला जोरात धडकला. याचवेळी पिकअपच्या पाठीमागे असलेला कंटेनरने पुन्हा पिकअपला जोरदार धडक दिली. या अपघातात पिकअपमधील सुनील व विजय यांचा जागेवरच मृत्यू झाला. तर पाठीमागून आलेल्या कंटेनरचालक पिकअपकला धडकल्याने गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती मिळत आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.