उरुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत बेकायदा बिगर परवाना दारू विक्री करणाऱ्यांवर उरुळी कांचन पोलिसांनी धडक कारवाई सुरूच ठेवली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आणखी दोघांना त्याच ठिकाणाहून ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून १४ हजारांचा मुद्देमालही जप्त केल्याची माहिती उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांनी दिली.
याप्रकरणी सतीश धर्मा बारंगुळे (वय – ४८, रा. फाउंडेशन रोड, तांबेवस्ती, उरूळी कांचन ता. हवेली) व श्रीकांत तुकाराम घुले वय – ५८, रा. बायफ रोड उरूळी कांचन ता. हवेली) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलीस हवालदार प्रविण नारायण चौधर व प्रशांत शामराव खुटेमाटे यांनी फिर्याद दिली आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (ता. १६) पोलीस पथक दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास उरुळी कांचन गाव परिसरात गस्त घालीत असताना तांबेवस्ती परिसरात जय भवानी हॉटेलच्या भिंतीच्या आडोशाला सतीश बारंगुळे यांच्याकडे बेकायदा बिगरपरवाना देशी विदेशी दारूच्या ५ हजार ९८० रुपयांच्या बाटल्या आढळून आल्या. याप्रकरणी उरुळी कांचन पोलिसांनी पोलीस हवालदार प्रविण चौधर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे.
तसेच उरूळी कांचन गावचे हद्दीतील मल्हार हॉटेलच्या पाठीमागे भिंतीचे आडोशाला श्रीकांत घुले याच्याकडे बेकायदा बिगर परवाना देशी विदेशी दारूच्या ७ हजार ९३५ रुपयांच्या बाटल्या आढळून आल्या. याप्रकरणी पोलीस हवालदार प्रशांत खुटेमाटे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक काळे करीत आहेत.
पाच दिवसात दुसरी कारवाई
उरुळी कांचन ग्रामीण पोलिसांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाच दिवसात सोरतापवाडी, शिंदवणे व उरुळी कांचन येथील चार जणांकडून मुद्देमाल जप्त करून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.