उरुळी कांचन, ता. 12 : उरुळी कांचन – जेजुरी रस्त्यावरील (Uruli Kanchan) शिंदवणे घाटात जेजुरीच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरमधून पोकलेन मशीन अचानक कंटेनरमधून निसटून रस्त्यावर पडल्याची घटना घडली. शनिवारी (ता. 12) मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला असून, रात्रीची वेळ असल्याने मोठा अपघात टळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कंटेनर पोकलेन मशीन घेऊन घाटातून जात होता. घाटातील एका तीव्र वळणावर मशीनचे संतुलन बिघडले आणि ते थेट डांबरी रस्त्यावर कोसळले. अवजड मशीन रस्त्यावर पडल्याने मोठा आवाज झाला, ज्यामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण होते.
ही घटना मध्यरात्री घडल्याने घाटात इतर वाहनांची वर्दळ कमी होती. जर हीच घटना दिवसा किंवा वाहनांची गर्दी असताना घडली असती, तर मोठा अनर्थ ओढवला असता. पोकलेन मशीन पडले तेव्हा आसपास कोणतेही लहान वाहन नसल्याने कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झालेली नाही.
दरम्यान, रस्त्याच्या बाजूला मशीन पडल्याने अवजड वाहनांच्या वाहतुकीला काही वेळ अडथळा निर्माण झाला होता. मात्र थोड्या वेळाने वाहतूक सुरुळीत झाली.







