पुणे, ता. 12: पुणे शहरात पुन्हा एकदा गुन्हेगारीचा (Pune News) थरार उफाळून आला आहे. खडक पोलीस ठाणे हद्दीत 16 वर्षीय अल्पवयीन मुलाचा निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना काशेवाडी परिसरातील त्रिकोणी गार्डन जवळ शनिवारी (ता.11) रात्री घडली आहे. या गुन्ह्यातील दोन आरोपींना विमाननगर पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे.

अबूबकर अमजद खान (वय 16, रा. ए.डी. कॅम्प चौक, समर्थ, पुणे) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. तर तुफेलअली अश्रफअली सय्यद (वय 19) आणि कमरअली सज्जदअली सय्यद (वय 19, दोघेही रा. म्हाडा कॉलनी, विमाननगर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अबूबकर खान याच्यावर काही अज्ञात इसमांनी धारदार हत्याराने सपासप वार केले. या भीषण हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला आणि उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली. हल्लेखोर विमाननगर येथील असल्याची माहिती समोर येताच विमाननगर पोलीस स्टेशनच्या पथकाने वेगाने हालचाल करत शोधमोहीम राबवली.
या कारवाईत तुफेलअली सय्यद आणि कमरअली सय्यद या दोघांना अटक केली. त्यांच्याकडे कसून चौकशीकेली असता आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेले धारदार हत्यार जप्त केले असून पुढील तपासासाठी त्यांना खडक पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कामगिरी विमाननगर पोलीस ठाण्याच्या तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक राठोड, पीएसआय घागरे, पोलीस नाईक जोगदंडे, पोलीस अंमलदार लालु कऱ्हे, हरिप्रसाद पुंडे,सागर कासार,प्रशांत सुतार, घागरे ,मार्शल संजयपार्क व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे.







