मुंबई: मुंबई उच्च न्यायालयाने कामाच्या ठिकाणी वर्तनासंदर्भात एक महत्त्वाचा निर्णय देताना स्पष्ट केलं आहे की, ऑफिसमध्ये महिला सहकाऱ्याच्या स्तनाकडे एकटक पाहणे हे नैतिकदृष्ट्या चुकीचं असलं तरी ते कायद्याने ‘व्हॉय्युरिझम’ मानलं जाऊ शकत नाही.

न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठाने हा निकाल देताना सांगितलं की, एखाद्या महिलेच्या शरीराकडे अशा प्रकारे पाहणे हे व्यावसायिक वातावरणाला शोभणारे नाही आणि ते आक्षेपार्ह आहे. मात्र, भारतीय दंड संहितेच्या कलम 354C अंतर्गत त्याला गुन्हा ठरवण्यासाठी आवश्यक असलेल्या अटी या प्रकरणात पूर्ण होत नाहीत.
कोर्टाने स्पष्ट केलं की, व्हॉय्युरिझम म्हणजे एखाद्या महिलेच्या खासगी क्षणांमध्ये तिची परवानगी न घेता तिला पाहणे किंवा तिचे फोटो, व्हिडिओ काढणे. उदाहरणार्थ, महिला कपडे बदलत असताना किंवा स्वच्छतागृहात असताना तिला चोरून पाहणे हे या कलमांतर्गत गुन्हा ठरतो. मात्र, ऑफिससारख्या सार्वजनिक किंवा कार्यस्थळी फक्त एकटक पाहणे या व्याख्येत बसत नाही.
हे प्रकरण एका खासगी कंपनीतून समोर आले होते. एका महिला कर्मचाऱ्याने आपल्या सहकाऱ्यावर आरोप केला होता की तो तिच्या स्तनाकडे सतत पाहत होता आणि अश्लील टिप्पणी करत होता. या तक्रारीची चौकशी कंपनीच्या अंतर्गत समितीने केली होती, मात्र त्यात आरोपी निर्दोष आढळला. तरीही त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सुनावणीदरम्यान कोर्टाने नैतिकता आणि कायदा यामधील फरक अधोरेखित करत सांगितलं की, प्रत्येक चुकीचं वर्तन हे कायद्याने गुन्हा ठरत नाही. संबंधित वर्तन आक्षेपार्ह असलं तरी त्याचा समावेश व्हॉय्युरिझमच्या कक्षेत होत नाही, असं स्पष्ट करत न्यायालयाने एफआयआर रद्द केला.






