पुणे: लोणावळ्यातील लोहगड किल्ल्यावर झालेल्या केतन अग्रवाल हत्याकांडाचा तपास आता एका निर्णायक वळणावर येऊन पोहोचला आहे. या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार असलेल्या सिया गोयल आणि चेतन चौधरी यांची पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने, आज दुपारी २:३० च्या सुमारास त्यांना वडगाव मावळ येथील न्यायालयात हजर केले जाणार आहे. या महत्त्वाच्या सुनावणीच्या काही तास आधीच पुणे ग्रामीण पोलिसांच्या हाती एक मोठा पुरावा लागला असून, त्यांनी प्रकरणातील संशयास्पद हालचालींशी संबंधित असलेल्या एका तरुणाला ताब्यात घेतले आहे.

केतनच्या हत्येचा कट केवळ सिया आणि चेतन यांनीच रचला नसून, त्यांना कोणाचे तरी पाठबळ होते, हा पोलिसांचा प्राथमिक संशय या नव्या अटकेमुळे खरा ठरला आहे. ताब्यात घेतलेला तरुण हा मुख्य आरोपी चेतन चौधरी याचा महाविद्यालयीन मित्र आहे. बीड जिल्ह्यातील मूळचा रहिवासी असलेला हा युवक सध्या पुण्याच्या बालेवाडी परिसरातील एका कंपनीत कार्यरत आहे. मे महिन्याच्या अखेरीस तो चेतनच्या सातत्याने संपर्कात असल्याचे तांत्रिक तपासातून समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या मित्राला चेतन आणि सिया यांनी हत्येच्या संपूर्ण नियोजनाची माहिती दिली होती. धक्कादायक म्हणजे, “असे टोकाचे पाऊल उचलू नका,” अशी समज देऊनही त्याने आरोपींना रोखण्याचा प्रयत्न केला होता. असे असूनही आरोपींनी त्याचे म्हणणे धुडकावून लावले. या व्यतिरिक्त, १८ जून रोजी आरोपींनी त्याला लोहगड येथे येण्यासाठी जबरदस्तीने बोलावले होते, मात्र तो तिथे गेला नाही. गुन्ह्यानंतर चेतन चौधरीने सर्वप्रथम याच मित्राची भेट घेतली होती, तर सिया गोयल हिनेही त्याच्याशी संवाद साधला होता, हे तपासातून उघड झाले आहे.
या नवीन दुव्यामुळे केतन हत्याकांडाचे गुढ आता हळूहळू उलगडत असून, न्यायालयीन सुनावणीत पोलीस आता आणखी काय पुरावे सादर करणार, याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.







