उरुळी कांचन, (पुणे) : शेतात तोडलेला ऊस ट्रक्टरमध्ये भरताना ह्रदयविकाराचा झटका आल्याने एका कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. खामगाव टेक (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत मंगळवारी (ता. 26) पहाटे हि घटना घडली आहे.
उद्धव गरदाल पवार (वय – 56, रा. टिटवी ता. पारोळा, जिल्हा जळगाव, सध्या खामगाव टेक ता. हवेली) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पन्नीलाल इंदल पवार, (वय 32, उसतोडी कामगार, रा. सदर) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पन्नीलाल पवार हे खामगाव टेक परिसरात राहतात. 15 दिवसांपूर्वी टिटवी या मूळ गावातील व नात्यातील 27 लोक हे दौंड शुगर कारखाना प्रायव्हेट लिमिटेड यांच्या तर्फे ऊसतोड करण्याकरिता खामगाव टेक या ठिकाणी आले होते. यावेळी इंदल पवार यांचे चुलते उद्धव पवार हेही ऊस तोडणीसाठी आले होते.
मंगळवारी (ता. 26) पहाटे चार वाजता खामगावटेक हद्दीतील विजय पतंगराव कदम यांचे शेतामध्ये ऊस तोडणी करताना विजय उध्दव पवार यांचा फोन आला की, वडील उध्दव पवार हे ट्रक्टरमध्ये ऊस भरीत असताना त्यांना चक्कर येवून ते खाली पडल्याने ते मयत झाले आहेत. पन्नीलाल पवार हे तातडीने मळद (ता. दौंड) येथून खामगावटेक येथे आले व त्यांनी पाहिले असता यावेळी चुलते उध्दव पवार यांचा मृत्यू झाल्याचे समजले.
दरम्यान, खामगाव टेक येथून रुग्णवाहिकेच्या माध्यामातून उद्धव पवार यांना उरुळी कांचन येथील सरकारी दवाखाण्यात दाखल केले. परंतु, डॉक्टरांनी तपासणी करून उपचारापूर्वीच त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचे सांगितले. याप्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. तपास पोलीस हवालदार सलीम शेख करीत आहेत.