उरुळी कांचन, (पुणे) : मातृभाषेचा अभिमान बाळगत व्यवहारिक जीवनामध्ये इंग्रजी देखील विद्यार्थ्यांना बोलता आले पाहिजे. इंग्रजी ही आता सर्वत्र आवश्यक भाषा बनली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना इंग्रजी लिहिता, वाचता व बोलता आली पाहिजे, असे उरुळी कांचन येथील बायफ डेव्हलपमेंट रिसर्च फाउंडेशनचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. नारायण हेगडे यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाची गोडी वाटावी, इंग्रजी शिक्षण आनंददायी व्हावे, विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा या उद्देशाने उरुळी कांचन (ता. हवेली) येथील स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, स्वामी विवेकानंद अकॅडमी, व उन्नती कन्या विद्यालय येथे शनिवारी (ता. 13) शिक्षक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून हेगडे बोलत होते.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुरेश कांचन, उपाध्यक्ष सुरेश सातव, सचिव पंडित कांचन, उन्नती कन्या विद्यालयाच्या प्राचार्या डॉ. नुपूर कांचन, स्वामी विवेकानंद अकॅडमीचे प्राचार्य दास सर, स्वामी विवेकानंद विद्यामंदिरच्या मुख्याध्यापक ज्योति भोसले, मुख्याध्यापक सरिता राऊत, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
पुढे बोलताना हेगडे म्हणाले, “जोपर्यंत किमान इंग्रजीचे वातावरण घरात तयार होत नाही, तोवर इंग्रजीची सवय लागणार नाही. तुमच्या अवतीभवती नियमितपणे इंग्रजी बोलणारे वातावरण जर असेल तर निश्चितपणे इंग्रजी लवकर बोलणे शक्य होईल.”
दरम्यान, डॉ. हेगडे यांनी स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, स्वामी विवेकानंद अकॅडमी, व उन्नती कन्या विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी 500 प्रश्नावली तयार केली असून, या प्रश्नावलीत सर्व घटकांचा विचार केला आहे. ही प्रश्नावली शिक्षकांनी विद्यार्थ्यांद्वारे कशा पद्धतीने सोडवून घ्यायची व सोडून घेताना विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने माहिती द्यायची. या सर्व गोष्टीमुळे विद्यार्थ्यांच्या इंग्रजी ज्ञानामध्ये कशा पद्धतीने भर होईल, या सर्व बाबीवर डॉ. हेगडे यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले.